आमदार काशीनाथ दाते यांच्या भूमिअभिलेख अधिकाऱ्यांना सूचना
पारनेर | नगर सह्याद्री
भूमिअभिलेख कार्यालयातील जमिनींच्या मोजणी प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा. शेतकऱ्यांची अडवणूक न करता त्यांना केवळ तारखा देण्याऐवजी प्रत्यक्ष मोजणीसाठी अधिकारी पाठवा, अशा कडक सूचना आमदार काशिनाथ दाते यांनी दिल्या आहेत.
तालुक्यातील जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आमदार दाते यांच्या उपस्थितीत भूमिअभिलेख अधिकारी व कर्मचाऱ्यांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती, याप्रसंगी ते बोलत होते.सध्या पारनेर तालुक्यात तब्बल 2 हजार 233 मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. यापैकी केवळ 713 प्रकरणांना तारखा देण्यात आल्या असून, 1320 प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. कार्यालयात सध्या 8 नियमित कर्मचारी असून, खासगी व इतर एजन्सींचे मिळून एकूण 30 कर्मचारी कार्यरत आहेत. या मनुष्यबळाचा वापर करून प्रलंबित कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार दाते यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या जमिनींचे एकत्रिकरण आणि हद्द निश्चितीची प्रकरणे अनेक वर्षांपासून रखडली आहेत. शेतकऱ्यांना कार्यालयाचे उंबरठे झिजवायला लावू नका, अशा शब्दांत आमदारांनी अधिकाऱ्यांना सुनावले. या बैठकीला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडल्या. यावर उत्तर देताना उपअधीक्षक जितेंद्र भिंगारदिवे म्हणाले की, कार्यालयातील अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे ही प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. मात्र, आता ज्या शेतकऱ्यांना तारखा मिळाल्या नाहीत, त्यांना त्या त्वरित दिल्या जातील. तसेच हद्दी दाखवण्यासाठी आणि एकत्रिकरणाची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.या बैठकीला उपअधिक्षक, शिरस्तेदार विजय चंद्रे, परिरक्षण भूमापक प्रशांत शिंदे, कनिष्ठ लिपिक दुर्गेश सोनार यांच्यासह भूमिअभिलेखचे कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.
मोजण्या राहिल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा
भूमिअभिलेखमध्ये प्रलंबित असणाऱ्या मोजणी प्रकरणासाठी अधिकाऱ्यांना तातडीने ते प्रकरण निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतरही काही शेतकऱ्यांच्या मोजण्या राहिल्या असल्यास त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. याप्रकरणी तातडीने कार्यवाही करण्यात येईल. – आ. काशिनाथ दाते










