- जाहिरात -spot_img
breaking news

समृद्धी महामार्गावर लुटमार करणारी टोळी जेरबंद; अपघातातून राडा, इन्स्टाग्रामवर तरुणीची बदनामी…

सहा आरोपी अटकेत | 9.28 लाखांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
समृद्धी महामार्गावर वाहनचालकांना मारहाण करून डिझेल, रोख रक्कम आणि दागिने लुटणाऱ्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार दिवसांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 9 लाख 28 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील लांबोटा येथील दत्ता बाबुराव राजुळे हे 27 मे रोजी ट्रकमधून डिझेल घेऊन जात असताना समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक 529.9 जवळ 7 ते 8 जणांच्या टोळीने त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून ट्रकमधील डिझेल आणि रोख रक्कम लुटली.

यानंतर याच टोळीने एका वॅगनआर कारला अडवून चालक व त्याच्या पत्नीला दमदाटी करत सुमारे 1 लाख 24 हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. त्याच रात्री दुसऱ्या ट्रकचालकाला मारहाण करून 150 लिटर डिझेल व रोख रक्कम लुटण्यात आली. या तिन्ही घटनांमध्ये एकूण 1 लाख 50 हजार 415 रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला होता. या घटनेप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार केले.

तांत्रिक विलेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जालना जिल्ह्यातील अंबड परिसरातून निखील बद्रीनारायण गोरे (वय 19) आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई करत कोकमठाण परिसरातून शिवनाथ शांताराम आव्हाड (वय 24), ओम बालाजी खरात (वय 19), राहुल साधाकिसन कोकाटे (वय 23) आणि साईराज गणेश शहाणे (वय 21) यांना अटक केली.आरोपींकडून व्हेरना व स्विफ्ट कार, सहा मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 9 लाख 28 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपींना पुढील तपासासाठी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित साथीदारांचा शोध सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, भिमराज खर्से, राहुल डोके, सतिष भवर, रोहित येमुल, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड यांच्या पथकाने केली.

हे सुद्धा वाचा :  मनपात काय ठरलं ; स्थायीच्या सभापतीपदी सुभाष लोंढे बिनविरोध, पदाधिकारी काय म्हणाले पहा

इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून तरुणीची बदनामी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सोशल मीडियाचा गैरवापर करून तरुणीची बदनामी करणाऱ्या आणि लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या एका विकृताविरुद्ध अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून या तरुणीला सातत्याने अलील आणि त्रासदायक संदेश पाठवले होते.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 26 वषय तरुणी कोळगाव परिसरातील रहिवासी असून ती अंतर्गत सजावटकार म्हणून काम करते. आरोपी मोबाईल क्रमांक धारकाने पीडितेच्या नावाने इन्स्टाग्राम सोशल मीडिया संकेतस्थळावर वेगवेगळी बनावट खाती उघडली. यामध्ये त्याने तरुणीची बदनामी करण्याच्या उद्देशाने बनावट ओळख तयार केली. या बनावट खात्यांच्या माध्यमातून आरोपीने पीडित तरुणीच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावर अलील, लज्जा उत्पन्न होईल असे संदेश पाठवले. हा प्रकार एप्रिल महिन्यामध्ये नऊ ते दहा दिवसांच्या कालावधीत सातत्याने सुरू होता. या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांक धारक आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अंमलदार सविता खताळ करत आहेत.

अपघातातून झाला राडा तोडफोड करत गाडी पळवली
पारनेरच्या दोघांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर ते पुणे महामार्गावर चास गावच्या शिवारात अपघाताच्या कारणावरून झालेल्या वादात टोळक्याने फिर्यादीच्या नातेवाईकांना धक्काबुक्की करत वाहन बळजबरीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात किशोर ब्राम्हणे आणि अमोल ब्राम्हणे (दोघे रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांच्यासह काही अनोळखी लोकांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किरण बाळासाहेब शेटे (वय 30 वर्षे, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

हे सुद्धा वाचा :  शवविच्छेदन प्रक्रियेतील दिरंगाई! आमदार दाते यांनी झापल..

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चास गावच्या शिवारामध्ये असणाऱ्या दुर्वा हॉटेलच्या शेजारी आणि भारत पेट्रोल पंपाच्या जवळ हा प्रकार घडला. फिर्यादी किरण शेटे यांच्या वाहनाला आरोपीने आपल्या ताब्यातील वाहन हलगजपणे आणि भरधाव वेगात चालवून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर आरोपींनी आपल्या गाडीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई फिर्यादी यांच्याकडे मागितली. परंतु, फिर्यादी यांनी ही नुकसान भरपाई देण्यास नकार दिला.

याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी किशोर ब्राम्हणे, अमोल ब्राम्हणे आणि त्यांच्यासोबत असलेल्या अज्ञात लोकांनी फिर्यादी यांच्या नातेवाईकांना रस्त्यात अडवले. आरोपींनी नातेवाईकांना शिवीगाळ करत जोरदार धक्काबुक्की केली आणि त्यांना जबरदस्तीने धमकावले. यानंतर अपघातातील गाडी फिर्यादीच्या नातेवाईकांच्या ताब्यातून बळजबरीने टोईंग करून आरोपी अज्ञात ठिकाणी पळवून घेऊन गेले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

शेतजमीन परत करण्यासाठी महिलेला धमकी
अहिल्यानगर ः तालुक्यातील निंबळक शिवारामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, खरेदी केलेली शेतजमीन परत देण्यासाठी एका महिलेला फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर संशयित आरोपीने पीडित महिलेच्या शेतातील खोलीत बेकायदेशीरपणे प्रवेश करून ती खोली आग लावून पेटवून दिली. या आगीत खोलीतील महत्त्वाचे दस्तऐवज, कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने निंबळक शिवारातील गट क्रमांक 487/अ मधील शेतजमीन खरेदी केली होती. हीच जमीन पुन्हा परत मिळावी म्हणून संशयित आरोपी सचिन बबन बारस्कर (रा. आहिल्यानगर) हा ऑगस्ट 2025 ते 26 मे 2026 या कालावधीत पीडित महिलेला सतत फोन करून धमकावत होता. जमीन परत न केल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी त्याने दिली होती.यानंतर संशयिताने थेट शेतातील खोलीत घुसून जाणीवपूर्वक आग लावली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी आणि पोलीस अंमलदार खामकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी सचिन बारस्कर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ