पात्र शेतकऱ्यांनी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण, फार्मर आयडी तयार करणे अनिवार्य
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ्2026चा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी बायोमेट्रिक (अंगठा) आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून फार्मर आयडी तयार करणे अनिवार्य असल्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.
नैसर्गिक आपत्ती, अनियमित पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आदी कारणांमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने दि. 2 जून 2026 रोजी झालेल्या बैठकीत या योजनेस मान्यता दिली आहे. योजनेअंतर्गत दि. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जांपैकी दि. 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकी असलेली आणि दि. 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली कर्जे विचारात घेतली जाणार आहेत. पात्र शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांची थकबाकी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजनेअंतर्गत अतिरिक्त रक्कम स्वतः भरल्यानंतर शासनाचा लाभ मिळणार असून त्यासाठी दि. 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
तसेच वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सन 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना कमाल 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 1 लाख 92 हजार 282 खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात येणार असून त्या ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, विकास सेवा सोसायटी कार्यालय तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या नोटीस फलकावर पाहता येतील. तसेच शासनाच्या अधिकृत कर्जमुक्ती पोर्टलवर किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात आधार क्रमांकाच्या साहाय्याने यादीतील नाव आणि संबंधित युनिक क्रमांक तपासता येईल.
यादीत नाव समाविष्ट झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा बँकेत जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. तसेच ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून फार्मर आयडी तयार झाल्यानंतरच आधार प्रमाणीकरण करता येणार आहे. त्यामुळे अद्याप ग्रीस्टॅकवर नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी ती तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.










