मुंबई / नगर सह्याद्री :
ठरलं तर मग फेम अभिनेत्री जुई गडकरी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखली जाते. अभिनयासोबत प्रवास करायलाही तिला विशेष आवडत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जुईने तिच्या सोलो ट्रॅव्हलिंगच्या अनुभवांबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.
यावेळी तिने थायलंडमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय सोलो ट्रिपदरम्यान घडलेला एक धक्कादायक आणि भीतीदायक प्रसंगही सांगितला. जुईने सांगितले की, लहानपणापासूनच मला आई-वडिलांमुळे मला प्रवासाची आणि नवीन ठिकाणे पाहण्याची आवड निर्माण झाली. वेगवेगळ्या संस्कृती, निसर्ग आणि नवीन अनुभव जाणून घेणे मला नेहमीच आवडते. त्यामुळेच स्वतःच्या कमाईतून मी पहिली परदेशवारी थायलंडला केली होती. या प्रवासादरम्यान घडलेली घटना आठवत जुई म्हणाली की, मी एका ग्रुपसोबत फिरत होती. मात्र, मध्यरात्री साधारण अडीचच्या सुमारास मी त्या ग्रुपपासून वेगळी झाली आणि अनोळखी भागात हरवली. तो परिसर सुरक्षित वाटत नव्हता.

आजूबाजूला सुरू असलेल्या काही विचित्र हालचाली पाहून मी घाबरले होते. अशा वेळी अनेकजण गोंधळून जातात, पण मी शांत राहण्याचा निर्णय घेतला. जुईने सांगितले की, मला एक सवय आहे. मी जिथेही प्रवासाला जाते, तिथल्या रस्त्यांचे, महत्त्वाच्या ठिकाणांचे आणि ओळख पटेल अशा जागांचे फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवते. त्याच सवयीचा मला त्या रात्री मोठा फायदा झाला. फोनमधील फोटो पाहत आणि रस्ते ओळखत मी हळूहळू हॉटेलचा मार्ग शोधला. साधारण तीनच्या सुमारास मी सुरक्षितपणे हॉटेलमध्ये परतली.

हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर तिच्यासोबत असलेल्या ग्रुपमधील सदस्यांना तिची चिंता वाटत असल्याचे तिला समजले. मात्र, ती सुरक्षित परतल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या अनुभवातून तिला मोठा धडा मिळाल्याचेही जुईने सांगितले. “अशा प्रसंगी घाबरण्याऐवजी शांत राहून विचार केला, तर मार्ग नक्की सापडतो,” असे ती म्हणाली.










