कामाचा दर्जा व गती कायम राखण्याच्या सक्त सूचना,
नगरपंचायतीमध्ये रस्ते प्रकल्प, प्रलंबित विकासकामांचा आढावा
पारनेर | नगर सह्याद्री
शहराचा विकास हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या त्रिसूत्री समन्वयावर अवलंबून असतो. शहराच्या सर्वांगीण रस्ता विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केले.
शहराच्या पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी आणि सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी पारनेर नगरपंचायत सभागृहात आयोजित विशेष रस्ते आढावा बैठकीत त्यांनी शहरातील रस्ते प्रकल्प, चौक सुशोभीकरण या प्रलंबित विकासकामांचा सविस्तर आढावा घेत प्रशासनाला कामाचा दर्जा व गती कायम राखण्याच्या सक्त सूचना दिल्या आहे.आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यातून पारनेर शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ते कामे सुरू आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणी दूर करण्यावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली.
खा. लंके यांनी स्पष्ट केले की, खडकी ते देवीभोयरे या मुख्य रस्त्याचे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले जाईल. या रस्त्याच्या रुंदीकरणासोबतच म्हसणे फाटा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि हिंद चौक, मिलन चौक सुशोभीकरण करणे तसेच शहराच्या वर्दळीच्या ठिकाणांवर भूमिगत ड्रेनेज लाईन, अत्याधुनिक स्ट्रीट लाईट्स आणि इतर पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे. हे सर्व काम मूळ मंजूर आराखड्यामधील नियोजनानुसारच पूर्ण होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. शहरातील वाढती वाहतूक आणि त्यामुळे होणारे अपघात यावर खासदार लंके यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. सुरक्षित वाहतुकीसाठी शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’ (धोकादायक वळणे) त्वरित शोधून ते हटवण्यावर त्यांनी भर दिला. रस्ते रुंदीकरण करताना येणारे अडथळे आणि अतिक्रमणे त्वरित हटवून वाहनधारकांना सुरक्षित प्रवास मिळेल, याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. याशिवाय, शहराच्या सौंदयकरणासाठी आणि पथदिव्यांच्या जाळ्याच्या विस्तारासाठी आवश्यक ती तरतूद करून शहराचे रूप पालटण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
औद्योगिक प्रगतीला चालना भविष्यातील एमआयडीसीची वाढती व्याप्ती आणि त्यामुळे वाढणारी वर्दळ लक्षात घेता, रस्त्यांच्या उत्तम जाळ्यामुळे दळणवळण सुलभ होईल आणि परिणामी शहराच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास खासदार लंके यांनी व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, ठेकेदार आणि नगराध्यक्ष डॉ. विद्या कावरे, उपनगराध्यक्ष सुप्रिया शिंदे आणि नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंका शिंदे यांना विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. याबैठकीला बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर, रा. या. औटी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, डॉ. बाळासाहेब कावरे, माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ, माजी उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर, नगरसेवक भूषण शेलार, राजू शेख, ऋषिकेश गंधाडे, नगरसेवक अमित जाधव, नगरसेवक शुभम देशमुख, वसीम राजे, माजी नगरसेवक डॉ. सादिक राजे, रायभान औटी, दीपक नाईक, शाहीर गायकवाड, डॉ. सचिन औटी, चंद्रकांत कावरे, बाळासाहेब नगरे, बाळासाहेब शेटे, शिवाजी लंके यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
समन्वयाने प्रश्न माग लावा
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हनुमान मंदिर जवळील पीर समाधी संबंधी प्रश्न उपस्थित करताच खा. नीलेश लंके यांनी सांगितले की, पारनेर तालुक्यात कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही, याची दक्षता घेऊन हिंदू व मुस्लिम बांधवांच्या समन्वयाने चर्चा करून प्रश्न माग लावला जाईल.
रस्त्यांच्या कामासंदर्भात ग्रामस्थांना विश्वासात घ्या
पारनेर शहरातून जात असलेल्या रस्त्याचे काम माग लागणे गरजेचे आहे. या रस्त्याचे सर्वेक्षण व मोजणी करत असताना रस्ते बांधकाम विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पारनेर शहरातील ग्रामस्थांना तसेच नगरपंचायतच्या पदाधिकारी व तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलेले नाही. शहरातून जात असलेल्या रस्त्यांच्या कामासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे.
-अर्जुन भालेकर, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
मंजूर आराखड्याप्रमाणे काम करा
पारनेर शहराचा डीपीआर मंजूर झाला आहे. त्यामुळे डीपीआरमध्ये मंजूर केलेल्या कामाप्रमाणे नियोजित काम करण्यात यावे.
– बाळासाहेब नगरे, पारनेर












