अहिल्यानगर | नगर सह्याद्री –
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीत संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत मौन धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
हे आंदोलन गुरुवार, दि. 23 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत गांधी स्मारक, वाडिया पार्क, अहिल्यानगर येथे होणार आहे.आंदोलनस्थळाला प्रतीकात्मक स्वरूपात नगरचे जंतर मंतर असे नाव देण्यात आले आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या परिस्थितीत लोकशाही मूल्यांचे संरक्षण, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत संवेदनशीलता आणि संवादातून मार्ग काढण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी हे मौन धरणे आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनातून दडपशाही नव्हे, संवाद हवा, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, लोकशाही आणि संविधानाचे रक्षण झाले पाहिजे असा शांततामय संदेश देण्यात येणार आहे. या मौन धरणे आंदोलनात विद्याथ, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ऍड. श्याम आसावा, अशोक सब्बन, विकास सुतार, संदीप कुसळकर, नंदाताई पांडुळे, तुलसीबाई पालीवाल, सतीश कांबळे, संतोष धर्माधिकारी यांनी केले आहे.










