- जाहिरात -spot_img
breaking news

तरुणावर चाकूने हल्ला, दुकानदाराची चार लाखांची फसवणूक, गॅस रिफीलिंगवर छापा

पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील गांधी मैदान परिसरात काल रात्री जेवण करून फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर जुन्या वादातून चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्‌‍यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात सविस्तर असे की काशिफ जुबेर शेख (वय 30, राहणार आशा टॉकिज, तख्ती दरवाजा, अहिल्यानगर) हा तरुण काल रात्री जेवण झाल्यानंतर फिरण्यासाठी बाहेर पडला होता. रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास तो गांधी मैदान परिसरात आला असता, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या दोघांनी त्याला गाठले.ऋषी मोरे (वय 28, राहणार केडगाव) आणि आशिष उर्फ सनि अनिल शिंदे (वय 30, राहणार गांधी मैदान, अहिल्यानगर) अशी हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहेत. या दोघांनी काशिफ याला रस्त्यात अडवून विनाकारण वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्याच्या अंगावर धावून गेले. काशिफने त्यांना तुम्ही असे का करत आहात, काय झाले? असे विचारण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी झालेल्या वादावादीत आरोपी ऋषी मोरे याने संतापाच्या भरात आपल्या कमरेला लावलेला तीक्ष्ण चाकू बाहेर काढला. काही समजण्याच्या आत त्याने काशिफच्या पोटावर चाकूने जोरात वार केले. या हल्ल्‌‍यात काशिफ रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्ला केल्यानंतर दोन्ही आरोपी तिथून पसार झाले होते.घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी काशिफला तात्काळ उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे मिळालेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शरद वाघ यांनी या गुन्ह्याची प्राथमिक नोंद केली आहे. पोलीस अधिक्षक आणि अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. एस. सेदवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  मनपाच्या 'त्या' निर्णयाला कर्मचाऱ्यांचा विरोध, दिला 'हा' इशारा

विद्यार्थ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला; राहुरी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा
राहुरी | नगर सह्याद्री
राहुरी रेल्वे स्टेशन जवळील पाटावर पोहण्यासाठी गेलेल्या 16 वषय विद्यार्थ्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवड येथील 16 वषय विद्याथ समर्थ अमोल म्हसे हा आपल्या मित्रांसह राहुरी रेल्वे स्टेशनजवळील पाटावर पोहण्यासाठी गेला होता. दुपारी सुमारे 3.15 वाजता पोहून झाल्यानंतर तो झाडाखाली बसलेला असताना आरोपी ऋषिकेश गणेश गाडे (रा. कोंढवड), शुभम शिवाजी पेरणे (रा. तांदुळवाडी) तसेच त्यांच्या सोबत आलेले दोन अनोळखी युवक लोखंडी रॉड घेऊन तेथे आले. शिवीगाळ करत समर्थ याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला.

हल्ल्यात त्याच्या उजव्या कानाजवळ, डोक्यावर आणि पाठीवर मारहाण करण्यात आली. आरोपी ऋषिकेश गाडे याने हा जिवंत आहे का बघा, हा मला गाडीवरून कट मारतो, असे म्हणत धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर समर्थ याच्या मित्रांनी त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालय नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुमारे सात दिवस विविध रुग्णालयांत उपचार घेतल्यानंतर प्रकृती सुधारल्याने त्याने ्रराहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी ऋषिकेश गणेश गाडे, शुभम शिवाजी पेरणे आणि दोन अनोळखी युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

गॅस रिफीलिंगवर छापा
अहिल्यानगर: शहरातील झेंडीगेट भागातील बाबा बंगाली गल्लीत उघड्या जागेवर शेडच्या आडोशाला बेकायदेशीरपणे घरगुती गॅस टाक्यांमधून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी रंगेहात पकडले. या धडक कारवाईत पोलिसांनी 1 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश राम शिंदे यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन येथे कायदेशीर फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, बाबा बंगाली गल्लीत विनापरवाना गॅसची चोरी आणि विक्री सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बातमीतील ठिकाणी अचानक छापा टाकला. या छाप्यात आरोपी असीम हमीद शेख (वय 33 वर्षे, रा. रामवाडी, सर्जेपुरा, अहिल्यानगर) हा एका पांढऱ्या रंगाच्या मारुती 800 गाडीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीरपणे गॅस भरताना मिळून आला.

हे सुद्धा वाचा :  छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सदैव प्रेरणादायी : श्रीकांत छिंदम, दिल्लीगेट येथील भव्य देखाव्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन

मोबाईल दुकानदाराची चार लाख 39 हजारांची फसवणूक
मोबाईलही लंपास, तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका मोबाईल दुकानदाराची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेत पैसे भरण्याच्या बहाण्याने एका तरुणाने बनावट पावत्या आणि खोटे शिक्के तयार करून तब्बल 4 लाख 17 हजार 200 रुपयांचा अपहार केला. तसेच दुकानातील 22 हजार 111 रुपये किमतीचा मोबाईल फोनही चोरून नेला. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या संदर्भात कल्याण रोडवरील रहिवासी आणि मोबाईल दुकान चालक प्रमोद दत्तात्रय गुंड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अंकित अर्जुन मोरे (उर्फ मिलिंद मोरे, रा. नेप्ती, अहिल्यानगर) या आरोपीविरुद्ध फसवणूक आणि चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद गुंड यांचे दिल्ली गेट परिसरातील चंद्रलोक अपार्टमेंटमध्ये मद मोबाईल स्पेस नावाचे दुकान आहे. त्यांनी आरोपी अंकित मोरे याच्यावर विश्वास ठेवून चितळे रोडवरील बँकेत व्यवसायाचे पैसे आणि सुरक्षा ठेव भरण्यासाठी दिले होते. मात्र, आरोपीने ही रक्कम बँकेत जमा न करता स्वतःकडेच ठेवून घेतली. फसवणूक उघडकीस येऊ नये म्हणून त्याने बँकेच्या खोट्या पावत्या तयार केल्या आणि त्यावर बँकेचे बनावट शिक्के मारून ते फिर्यादीला दाखवले.

हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता. संशय आल्यानंतर तपास केला असता हा सर्व फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. एवढेच नव्हे तर आरोपीने फिर्यादीच्या दुकानातून एक महागडा मोबाईल फोनही चोरून नेल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि तपास अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलीस अंमलदार महादेव गरड यांनी या गुन्ह्याची नोंद केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ