आयात शुल्क ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत
मुंबई / नगर सहयाद्री :
केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 6 टक्क्यांवरून थेट 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर देशभरातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. आज (13 मे रोजी) मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचा भाव प्रतिकिलो 2,95,805 रुपयांपर्यंत पोहोचला, तर सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,62,648 रुपयांवर गेला. जागतिक स्तरावरील महागाई आणि भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मौल्यवान धातूंना आधीच मजबूत आधार मिळत असताना, सरकारच्या या निर्णयामुळे दरात आणखी तेजी आली आहे. चांदीच्या किमतीत 6 टक्क्यांचा अपर सर्किटही लागला आहे.
सरकारने इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यानंतर वायदा बाजार (MCX) आणि किरकोळ बाजारात चांदीच्या किमतीत तब्बल 16,675 रुपये प्रति किलोची वाढ झाली आहे. ड्युटी वाढीच्या घोषणेनंतर MCX वर जुलै करारातील चांदीचा भाव 7.25 टक्क्यांनी वाढून 2,99,283 रुपये प्रति किलोच्या जवळ पोहोचला.
देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये चांदीने ऐतिहासिक पातळी गाठली आहे. चेन्नईमध्ये चांदीचा भाव 3,00,100 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. तर दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे चांदी 2,90,100 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
भारत आपल्या गरजेपैकी जवळपास संपूर्ण सोने आणि चांदी परदेशातून आयात करतो. या आयातीसाठी डॉलरमध्ये व्यवहार केला जातो. पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, देशाचा परकीय चलनसाठा वेगाने खर्च होत आहे. डॉलरची बाहेर जाणारी रक्कम कमी करण्यासाठी सरकारने गैर-आवश्यक आयातींवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची एकूण सोन्याची आयात 24 टक्क्यांनी वाढून 71.98 अब्ज डॉलरच्या विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. त्यामुळे देशाचा व्यापार तुटीचा आकडा) 333.2 अब्ज डॉलरपर्यंत गेला असून, चालू खाते तूट (CAD) जीडीपीच्या 1.3 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. या वाढत्या आर्थिक तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.










