खरीपपूर्व कामे ठप्प; शेतकरी व वाहनधारक हैराण
जामखेड | नगर सह्याद्री
शहरासह संपूर्ण तालुयात पेट्रोल व डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी, वाहनधारक आणि लहान व्यावसायिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक लागल्याने नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतीची कामे वेगात सुरू असताना इंधन टंचाईने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. एप्रिल व मे महिन्यांत नांगरणी, मोगडा, जमीन सपाटीकरण यांसारखी महत्त्वाची कामे सुरू असतात. मात्र, डिझेलअभावी ट्रॅटर बंद पडले असून, अनेक शेतकर्यांची कामे अर्धवट राहिली आहेत. त्यामुळे आगामी खरीप हंगाम धोयात येण्याची भीती व्यक्त होत आहे.तालुयातील ग्रामीण भागात परिस्थिती अधिकच गंभीर आहे. अनेक गावांमध्ये शेतकर्यांना ट्रॅटरसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
दुसरीकडे, दुचाकीधारकांना रोजच्या कामासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून शालेय विद्यार्थी, कामगार आणि छोटे व्यापारीही यामुळे प्रभावित झाले आहेत.दरम्यान, काही पेट्रोल पंप चालकांकडून मनमानी होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ठराविक वाहतूकदार व ओळखीच्या लोकांनाच इंधन दिले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. तसेच काळाबाजाराची शयता नाकारता येत नसून काही ठिकाणी डिझेलमध्ये भेसळ व मापातही गैरप्रकार होत असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.ही टंचाई नसून व्यवस्थेचे अपयश आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून संबंधित पंपचालकांची चौकशी करावी व इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरत आहे.तालुयातील नागरिकांनी तहसील प्रशासन, पुरवठा विभाग आणि जिल्हाधिकार्यांनी तातडीने लक्ष घालून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
शेतकर्यांवर दुहेरी संकट
उन्हाळ्यात शेतीची कामे सुरू असताना डिझेल टंचाईमुळे ट्रॅटर बंद पडले आहेत. यामुळे वेळेवर शेतीची मशागत होत नसून खरीप हंगाम धोयात येण्याची शयता वाढली आहे. मे महिन्यात शेतीची कामे पूर्ण होण्यासाठी बळीराजा धडपडत असताना त्यात डिझेल टंचाईने अडथळा आणला आहे.
मनमानी व काळाबाजाराचा संशय
काही पेट्रोल पंपांवर ओळखीच्या लोकांनाच इंधन दिले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच भेसळ आणि मापात गैरप्रकार होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.










