- जाहिरात -spot_img
breaking news

दागिने पॉलिशच्या बहाण्याने महिलेला लुटले, टरबूज खराब निघाल्याने सावेडीत राडा, तरुणीचा विनयभंग, भिंगारमध्ये हल्ला, कुठे काय घडलं पहा

अहिल्यानगरमधील भिंगारवाला चौकातील घटना
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील गजबजलेल्या भिंगारवाला चौक परिसरात दोन भामट्या महिलांनी एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक करून ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई येथील रहिवासी असलेल्या मीना अशोक जाधव या अहिल्यानगरमध्ये आल्या होत्या. पलक ज्वेलर्स समोरून रिक्षामध्ये बसलेले असताना दोन अनोळखी महिला त्यांच्या जवळ आल्या. या महिलांनी दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने जाधव यांचा विश्वास संपादन केला. तुमचे दागिने चमकवून देतो असे सांगून त्यांनी फिर्यादीला कानातील कर्णफुले आणि गळ्यातील सोन्याची मोहनमाळ काढण्यास भाग पाडले. त्यानंतर हातचलाखी करून एका कापडी पुडयामध्ये बनावट दागिने गुंडाळून ते जाधव यांना दिले आणि त्यांचे अस्सल दागिने घेऊन पोबारा केला.

काही वेळाने पुडके उघडले असता त्यात बनावट दागिने असल्याचे लक्षात आले. चोरीला गेलेल्या मालामध्ये २५ हजार रुपयांची कर्णफुले आणि ५० हजार रुपयांची मोहनमाळ असा एकूण ७५ हजार रुपयांचा ऐवज आहे. संशयित आरोपींमध्ये एक ७० वर्षीय वृद्ध महिला आणि एक ५० वर्षीय महिला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार वैशाली पटारे करत आहेत. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे.

टरबूज खराब निघाल्याने सावेडीत राडा
लोखंडी रॉडने मारहाण करत विनयभंग
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सावेडी उपनगरातील प्रेमदान चौक परिसरात असलेल्या एका बाजारपेठेत टरबूज परत केल्याच्या कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. विकत घेतलेले टरबूज खराब निघाल्याने ते परत करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला आणि त्यांच्या नातेवाईकांना आरोपींनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र दिवाकर पवार हे आपल्या नातेवाईकांसह सावेडी येथील स्मार्ट बाजार परिसरात खरेदीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी आरोपींकडून टरबूज खरेदी केले होते. मात्र, टरबूज खराब निघाल्याने ते परत करण्यास सांगितले असता आरोपींना त्याचा प्रचंड राग आला. याच वादातून आरोपी आदेश संजय नारद, संजय नारद, माया संजय नारद आणि एका अनोळखी इसमाने फिर्यादी आणि त्यांच्या मेहुण्याला लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली.
या झटापटीत आरोपींनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेला धक्काबुक्की करत तिचा विनयभंग केला. तुम्हा सर्वांना बघून घेतो, अशी धमकी देत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार प्रमिला गायकवाड करत आहेत. शहरात किरकोळ कारणावरून वाढणार्‍या वादाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा :  पारनेरमध्ये पाण्यात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू; कुठे घडल्या घटना...

फळविक्रेत्या कुटुंबाला बेदम मारहाण
अहिल्यानगर : सावेडी उपनगरातील प्रेमदान चौक परिसरात असलेल्या एका फळविक्रेत्या कुटुंबाला चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमदान चौक येथील शिवगोरख फ्रुट स्टॉलवर फिर्यादी महिला आणि त्यांचा मुलगा हजर असताना ही घटना घडली. दोन पुरुष आणि दोन महिलांनी दुकानावर येऊन किरकोळ कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. यावेळी निळा शर्ट घातलेल्या आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला दगडाने मारहाण करून जखमी केले. इतकेच नव्हे तर, काळा टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीने पीडित महिलेशी अत्यंत असभ्य वर्तन करून त्यांचा विनयभंग केला. या राड्यामध्ये आरोपींनी दुकानातील फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.

नात्याला काळिमा; तरुणीचा विनयभंग
अहिल्यानगर : शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी शाम आप्पासाहेब गवळी (रा. भोसले आखाडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी २९ एप्रिल रोजी दुपारी आपल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भोसले आखाडा परिसरातील तिच्या घरी गेली होती. यावेळी आरोपी शाम गवळी याने पीडितेचा विनयभंग केला. तसेच शिवीगाळ केली. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सूर्यकांत डाके आणि कवाष्टे करत आहेत.

भिंगारमध्ये उसनवारीच्या पैशांवरून जीवघेणा हल्ला
अहिल्यानगर: भिंगार येथील गोविंदपुरा नाका परिसरात जुन्या आर्थिक व्यवहारातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. सहा वर्षांपूर्वी दिलेले दोन लाख रुपये परत मागितल्याच्या रागातून तीन जणांनी मिळून एका मजुरास लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  उपबाजार समितीच्या जमीन मोजणीला ग्रामस्थांचा विरोध.... काय कारण

नेहरू कॉलनी येथील रहिवासी अभिलेख धर्मेंद्र वाघेला यांनी आरोपी मंगलसिंग ऊर्फ महावीर संतोषसिंग धारीवाल याला सहा वर्षांपूर्वी दोन लाख रुपये दिले होते. हे पैसे वाघेला यांनी परत मागितले असता, आरोपींना त्याचा राग आला. सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गोविंदपुरा नाका येथे आरोपींनी फिर्यादीला गाठले. यावेळी सुदर्शन मोहन गोहेर, मंगलसिंग धारीवाल आणि विशाल गोपाल गोहेर या तिघांनी मिळून वाघेला यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपी मंगलसिंग आणि विशाल गोहेर यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच वेळी सुदर्शन गोहेर याने लोखंडी रॉडने वाघेला यांच्या डाव्या हाताच्या कोपरावर आणि मनगटावर जोरात प्रहार केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला. जखमी तरुणावर अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ