अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला प्रश्न
पारनेर | नगर सह्याद्री
शेतकर्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या उत्पादनाच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने आग्रही भूमिका मांडत असलेल्या आमदार काशिनाथ दाते यांनी पुन्हा एकदा शेतकर्यांच्या हिताचा प्रश्न थेट विधानसभेत मांडत सातारा जिल्ह्यातील बनावट रासायनिक खते व कीटकनाशके तयार करणार्या कारखान्यांच्या प्रकरणावर सरकारचे लक्ष वेधले. सध्या सुरू असलेल्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी हा प्रश्न उपस्थित करत शासनाकडून सविस्तर माहिती मागवली. शेतकर्यांची फसवणूक करणार्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली.
आमदार दाते यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संबंधित विभागाचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यातील वडूज (ता. खटाव) परिसरात कृषी विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त कारवाईत बनावट रासायनिक खते व कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणावर बनावट
खतांची साठवण आढळून आली असून त्याची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याशिवाय जिल्हास्तरीय भरारी पथक आणि कृषी विभागाने संयुक्त तपास सुरू ठेवला असून शेतकर्यांची फसवणूक करणार्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जात असल्याचे शासनाने स्पष्ट केले. दरम्यान, शेतकर्यांना निकृष्ट व बनावट खतांपासून संरक्षण मिळावे, यासाठी अशा प्रकरणांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे आमदार काशिनाथ दाते यांनी सांगितले. शेतकर्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या उत्पादनाच्या सुरक्षिततेसाठी शासनाने अधिक सतर्कता बाळगावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी विधानसभेत केली.
संबंधित संस्था, पुरवठादार, मालकांवर गुन्हे ः मंत्री भरणे
या कारवाईत विविध नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट पिशव्यांमध्ये खते भरून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचेही निदर्शनास आले, संबंधित साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी संबंधित संस्था, पुरवठादार आणि मालकांविरोधात कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, खते नियंत्रण आदेश १९८५ तसेच आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.










