- जाहिरात -spot_img
breaking news

मुलाला जिवंत मारण्याची धमकी देत तांत्रिकाकडून महिलेवर अत्याचार.. कुठे घडला धक्कादायक प्रकार

‘काळुबाईची बाधा’ घालवण्याच्या बहाण्याने साडेसहा लाख रुपयांची फसवणूक

पारनेर/ नगर सह्याद्री
मतिमंद मुलाचा आजार बरा करण्याचे आणि भावाचे लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवून एका कुटुंबाची साडेसहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेरमध्ये उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर, मुलाला जिवंत मारण्याची धमकी देऊन भोंदूबाबाने पीडित महिलेवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात भोंदू बाबा, त्याचा मुलगा आणि महिला साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारनेर येथील रहिवासी असलेल्या ४० वर्षीय पीडित महिलेचा १७ वर्षांचा मुलगा मतिमंद आहे. वैद्यकीय उपचार करूनही त्याच्यात सुधारणा होत नव्हती, तसेच शेतीत पिके येऊनही घरातील कर्ज फिटत नव्हते. याच दरम्यान पीडितेचा भाऊ याचेही वय होऊनही लग्न जमत नव्हते. कौटुंबिक अडचणींनी खचलेल्या या महिलेला रुई छत्रपती (ता. पारनेर) येथील राजू बन्सी दिवटे, त्याचा मुलगा शशिकांत राजू दिवटे आणि महिला सहकारी शोभा अविनाश तरटे (रा. म्हसणे, पारनेर) हे देवऋषी (देवभगत) असून ते अडचणींवर तोडगा काढतात, अशी माहिती मिळाली होती.

पीडितेने २०२० मधील कोरोना काळापासून या भोंदूबाबाकडे जाण्यास सुरुवात केली. त्यावेळी संशयित भोंदूबाने, “तुमच्या कुटुंबाला मांढरदेवीच्या काळुबाईची बाधा आहे, त्यासाठी होमहवन व पूजा करावी लागेल,” असे सांगितले. मुलाच्या उपचारासाठी ३ ते ४ लाख आणि भावाच्या लग्नासाठी दीड लाख रुपये खर्च येईल, असे सांगून त्यांनी पीडितेकडून मुलाचे व भावाचे फोटो तंत्र-मंत्र करण्यासाठी मागवून घेतले. सुरुवातीला पूजा साहित्याच्या नावाखाली शोभा तरटे हिने १० हजार रुपये घेतले. त्यानंतर पारनेर येथील मुख्य बाजारपेठेतील चौधरी कॉम्प्लेक्समधील घरात काळुबाईच्या फोटोसमोर होमहवन करून पीडितेला अंगारा व तीर्थ पिण्यास दिले. जानेवारी २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान पीडितेने गायत्री कॉम्प्युटर्स, पारनेर यांच्यामार्फत २ लाख ५६ हजार ६८४ रुपये ऑनलाईन आणि एप्रिल २०२६ मध्ये २ लाख रुपये रोख, असे एकूण ४ लाख ५६ हजार रुपयांहून अधिक रक्कम राजू दिवटे याला दिली. तसेच भावाच्या विवाहासाठी एकूण १ लाख ९३ हजार ५३० रुपये ऑनलाईन व रोख स्वरूपात उकळले. ही सर्व रक्कम पीडितेने ‘येस बँक फायनान्स’कडून कर्ज काढून दिली होती.

हे सुद्धा वाचा :  महाराष्ट्राला हादरवणारं कांड, अशोक खरातच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश; लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर

पैसे उकळल्यानंतरही मुलाच्या तब्येतीत फरक पडला नाही. यादरम्यान आरोपी राजू दिवटे हा पीडितेला मांढरदेव येथे पूजेसाठी चारचाकी गाडीतून नेत असताना त्याने गाडीत अश्लील वर्तन केले. त्यानंतर चौधरी कॉम्प्लेक्समधील फ्लॅटवर “मुलाच्या उत्तम आयुष्यासाठी माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवावे लागतील, नाहीतर तुझ्या मुलाच्या फोटोचे तुकडे करून काळुबाईच्या कोपाने त्याला मारून टाकीन,” अशी धमकी दिली. मुलाच्या जिवाच्या भीतीने पीडितेने होकार दिला.

राजू दिवटे याने पीडितेला गुंगीचे किंवा रंगीत पाणी पाजून जानेवारी २०२५ ते १ मार्च २०२६ दरम्यान तब्बल ८ ते १० वेळा जबरदस्तीने अत्याचार केला .काहीही फरक न पडल्याने जेव्हा पीडितेने आणि तिच्या भावाने आपले पैसे परत मागितले, तेव्हा आरोपींनी दोघांनाही शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. “कुठेही तक्रार केली तर समाजात बदनाम करीन, सासरी नांदू देणार नाही,” अशी धमकी पीडितेला दिली, भावाला “एका रात्रीत तडफडून मारून टाकीन” अशी तांत्रिक धमकी दिली. भीतीच्या छायेत असलेल्या पीडितेने अखेर आपल्या सासू-सासऱ्यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यांनी धीर दिल्यानंतर पीडितेने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह बलात्कार, फसवणूक आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ