सुपा पोलिसांची धाडसी कारवाई
सुपा / नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी परिसरात एसीने भरलेला कंटेनर परस्पर वळवून माल लंपास करणाऱ्या टोळीचा सुपा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सुमारे ३५ लाख रुपयांचे ३२१ एसी बॉक्स जप्त करण्यात आले असून चोरीसाठी वापरलेला कंटेनर व पिकअप वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे औद्योगिक वसाहतीतील व्यावसायिकांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे.
७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सुपा एमआयडीसीतील म्हसणे फाटा येथील कैरियर मायडिया कंपनीतून ड्रायव्हर सर्जेराव दत्तू शिंदे (रा. जामगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) हे कंटेनर (क्र. एमएच १२, पीक्यू ६०१०) मधून अंदाजे ४७ लाख ३९ हजार ४१४.५५ रुपये किमतीचे एसी घेऊन हैदराबाद येथे माल उतरविण्यासाठी निघाले होते. मात्र संबंधित कंटेनर हैदराबाद येथे न नेता कर्नाटक राज्यातील गुलबर्गा परिसरात नेण्यात आला. तेथे कंटेनरमधील एसी माल चोरी करून कंटेनर एका पेट्रोल पंपावर उभा करून चालक फरार झाल्याची बाब उघडकीस आली.
याप्रकरणी फिर्यादी मनीष सतीश शर्मा (वय ३७, रा. खराडी, पुणे) यांच्या तक्रारीवरून सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी तातडीने पथक नेमून तपासाला गती दिली. तपासादरम्यान चोरीचा माल व आरोपी धाराशिव जिल्ह्यात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सुपा पोलिसांनी धाराशिव येथील स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधत संयुक्त कारवाईचे नियोजन केले.
सुपा पोलीस व धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून सोनू अशोक पठारे (वय २१, रा. गोलेगाव, ता. भूम, जि. धाराशिव), गंगाराम मुबाराव पवार (वय २१, रा. ढोकी, जयभवानीनगर, ता. धाराशिव) आणि भिबीषण नाना काळे (वय २५, रा. डोकी, जयभवानीनगर, ता. धाराशिव) या तिघांना अटक केली.
चौकशीदरम्यान आरोपींनी कबुली देत कंटेनरमधील एसी बॉक्स पिकअप (क्र. एमएच ४२, एआर ०५०५) वाहनातून नेत लक्ष्मण धनु पवार (रा. तेर, ता. जि. धाराशिव) यांच्या मोहतरवाडी शिवारातील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी छापा टाकून ३२१ एसी बॉक्स (अंदाजे किंमत ३५ लाख रुपये) जप्त केले. तसेच कंटेनर व माल वाहतुकीसाठी वापरलेली पिकअप गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलीस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे, पोलीस नाईक सतीश बर्डे, पोलीस कॉन्स्टेबल मेघराज कोल्हे, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु, नितीन शिंदे तसेच धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे सुदर्शन कासार, शौकत पठाण, प्रकाश अवताडे, जावेद काझी, फरहान पठाण, रत्नदीप डोंगरे आणि नागनाथ गुरव यांच्या पथकाने पार पाडली. पुढील तपास सुरू आहे.










