- जाहिरात -spot_img
breaking news

वाकोडीत तरुणाचा निर्घृण खून, मॅनेजरला मारहाण, दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेट- एजंटांचा जामीन फेटाळला, कुठे काय घडलं…

दोन आरोपींना भिंगार पोलिसांकडून अटक
​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरालगतच्या वाकोडी परिसरात एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करून मृतदेह पोत्यात भरून शेतात फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रसाद रोहीदास जाधव असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत अवघ्या काही तासांत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद जाधव हे २६ एप्रिल रोजी परीक्षेसाठी घरातून बाहेर पडले होते, मात्र ते परतले नाहीत. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी संशयाची सुई शुभम हरी भोसले आणि समाधान उर्फ बाळ्या रामदास सोनवणे यांच्याकडे वळवली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.
​आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, २६ एप्रिलच्या रात्री बुरूडगाव रस्त्यावर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून त्यांनी प्रसाद यांना दुचाकीवर बसवून वाकोडीतील एका उसाच्या शेतात नेले. तिथे लाकडी दांडक्याने आणि दगडाने डोक्यावर गंभीर प्रहार करून त्यांची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरून शेतात फेकला आणि त्यांची दुचाकी नदीकाठी झुडपात लपवून ठेवली. पोलिसांनी शेतातून मृतदेह हस्तगत केला असून दोन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. केवळ शिवीगाळ केल्याच्या कारणातून हा खून झाला की यामागे काही जुना वाद आहे, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

जुना वाद उफाळला; भिंगारमध्ये तरुणावर लोखंडी फायटरने हल्ला
​भिंगार – पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन एका तरुणावर लोखंडी फायटरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना भिंगारमधील शुक्लेश्वर मंदिर परिसरात घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, राजू नरसिंग दहिहंडे (वय ३२, रा. पाटील गल्ली, भिंगार) हे मंगळवारी रात्री शुक्लेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी आरोपी श्रावण बाळासाहेब काळे (रा. महारवाडा, भिंगार) याने जुन्या वादाची कुरापत काढून फिर्यादीला गाठले. “तुला खूप माज आला आहे,” असे म्हणत आरोपीने फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने संतापून आपल्या खिशातून लोखंडी फायटर काढले आणि फिर्यादीच्या डोक्यात जोराने प्रहार केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून, आरोपीने त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली.
​एका वर्षापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जखमी तरुणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राजू दहिहंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी श्रावण काळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जे. डी. मुळगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गारूडकर करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  ...तर दोन महिन्यांपूवच आमदार झालो असतो; डॉ. सुजय विखे पाटील काय म्हणाले पहा...

जुन्या व्यवहाराच्या कारणावरून मटण दुकानदारावर जीवघेणा हल्ला
​अहिल्यानगर – शहरातील मुकुंदनगर भागात जुन्या व्यवहारातील नोटरी आणि चेक परत देण्याच्या कारणावरून एका मटण दुकानदारावर धारदार शस्त्राने आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना प्रेमदान हॉटेल शेजारील बहार मटण शॉपसमोर घडली असून, याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​अब्दुल्ला जफर शेख (वय ५२, रा. मुकुंदनगर) हे आपल्या मटण दुकानावर असताना दानिश शेख, वसीम पटेल आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदाराने तिथे येऊन वाद घातला. “तू माझ्यासोबत केलेली नोटरी आणि चेक परत दे,” असे म्हणून दानिश शेख याने शिवीगाळ करत अब्दुल्ला यांच्या हाताच्या मनगटावर धारदार चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी वसीम पटेल आणि त्याच्या साथीदाराने लाकडी दांडक्याने त्यांना पाठीवर आणि कमरेवर बेदम मारहाण केली. आरडाओरड झाल्याने आजूबाजूचे लोक धावून आले असता, आरोपींनी जिवे मारण्याची धमकी देऊन तिथून पळ काढला.
​जखमी अब्दुल्ला शेख यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदवला. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार गोरडे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कामाचा अहवाल दिल्याच्या रागातून मॅनेजरला बेदम मारहाण; एमआयडीसी क्षेत्रातील घटना
​अहिल्यानगर: एमआयडीसी कार्यक्षेत्रातील एका कंपनीत कामाचा अहवाल वरिष्ठांना दिल्याच्या कारणावरून कंपनीच्या व्यवस्थापकाला (मॅनेजर) लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी ठोकळ्याने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुख्य आरोपीसह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र कुमार हमविर सिंग हे नागापूर परिसरातील एका हॉटेलच्या पाठीमागे वास्तव्यास असून ते एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. कंपनीतील पेन्ट शॉपजवळ आरोपी महेश साहेबराव गायकवाड हा कर्तव्यावर असताना झोपलेला जितेंद्र कुमार यांना आढळला होता. याबाबतची माहिती त्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. या माहितीनंतर व्यवस्थापनाने शिस्तभंग केल्याप्रकरणी महेश याची बदली कंपनीच्या दुसऱ्या विभागात केली होती.

हे सुद्धा वाचा :  सरसकट कर्जमाफी द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; बाबा महाराज झेंडे यांचा सरकारला इशारा!

​आपल्या बदलीला जितेंद्र कुमार जबाबदार असल्याचा राग मनात धरून महेश गायकवाड याने आपल्या दोन साथीदारांसह जितेंद्र कुमार यांना गाठले. क्लासिक व्हील कंपनीच्या समोर गाठून आरोपींनी त्यांना पाठीत लाथा मारून खाली पाडले. त्यानंतर हातातील कड्याने आणि लाकडी ठोकळ्याने त्यांच्या डोक्यावर प्रहार करत गंभीर दुखापत केली. तिघांनीही त्यांना बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर जितेंद्र कुमार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार शिंदे करत आहेत.

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेट : दोन एजंटांचा जामीन अर्ज फेटाळला
​अहिल्यानगर : जिल्हा रुग्णालयात बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर अटकेत असलेल्या दोन एजंटांना न्यायालयाने दणका दिला आहे. आरोपी दिलीप राजेंद्र आंधळे आणि जालिंदर उर्फ प्रेमकुमार अरुण वारे यांचा जामीन अर्ज मुख्य प्रथमवर्ग न्यायालयाने नामंजूर केला.

​या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून आतापर्यंत सात आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून, कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता थेट ऑनलाईन पोर्टलवर बनावट नोंदी करून ही प्रमाणपत्रे वाटली जात होती. आरोपींनी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी लोकांकडून ऑनलाईन पैसे घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

​पोलिस उपअधीक्षक गणेश उगले यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले की, हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून यात आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आरोपींना जामीन मिळाल्यास तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो. सरकारी पक्षाचा हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोघांचीही रवानगी कारागृहात केली आहे. या कारवाईमुळे बनावट प्रमाणपत्र लाटणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ