९६ हजार ४०० कोटींची देयके प्रलंबित
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महाराष्ट्र राज्य आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे विकासकामे करणार्या कंत्राटदार व विकासकांची देयके मोठ्या प्रमाणावर थकलेली आहेत. निधीअभावी ही देयके अदा होत नसल्याने राज्यभरातील सर्व विकासकामे मंगळवार (दि.७) पासून बंद ठेवून आंदोलन सुरु केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये मोठ्या गाजावाजात सत्तेत आलेल्या सरकारला १७ महिने पूर्ण झाले असले तरी प्रत्यक्षात आर्थिक स्थिती अत्यंत खालावलेली आहे. अर्थसंकल्पात मोठमोठी आश्वासने देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात राज्याची तिजोरी रिकामी असल्याचे चित्र आहे.राज्यातील विविध विभागांमध्ये प्रलंबित देयकांची आकडेवारी चिंताजनक आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागात मागील वर्षी ३७,००० कोटींपैकी अद्याप २९,००० कोटी बाकी आहेत. जलजीवन मिशन व महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणात ३९,००० कोटींपैकी ३५,००० कोटी प्रलंबित आहेत. ग्रामविकास व जलसंधारण विभागात ८,५०० कोटींपैकी ६,५०० कोटी, पर्यटन विकास महामंडळात ४,३०० कोटींपैकी ३,८०० कोटी, नगरविकास विभागात २,७०० कोटींपैकी २,१०० कोटी, जलसंपदा विभागात ११,००० कोटींपैकी ९,००० कोटी तर जिल्हा नियोजन समिती व इतर विभागांमध्ये १४,००० कोटींपैकी ११,००० कोटी देयके अद्याप बाकी आहेत.याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिकांकडेही निधीअभावी नवीन कामे सुरू झालेली नाहीत आणि तेथील प्रलंबित देयकांचाही आकडा मोठ्या प्रमाणावर आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्र्यांना २६ फेब्रुवारी व ३ मार्च रोजी लेखी निवेदन देण्यात आले होते.
तसेच ९ मार्च रोजी कर्जत येथे झालेल्या राज्यस्तरीय कंत्राटदार बैठकीत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.मागीलवर्षी एकूण १,१६,५०० कोटी रुपयांची देयके प्रलंबित होती. सध्या ही रक्कम ९६,४०० कोटींवर आली असली तरी गेल्या १७ महिन्यांत शासनाने केवळ सुमारे २०,००० कोटी रुपयांचीच देयके अदा केली आहेत. याचा परिणाम राज्यातील सुमारे ३ लाख कंत्राटदार, विकासक तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या अंदाजे ४ कोटी नागरिकांवर होत आहे.शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून ठोस निर्णय होत नसल्याने कामबंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य अध्यक्ष इंजि. मिलिंद भोसले, महासचिव सुनील नागराळे, राजेश देशमुख, संजय मैंद, मंगेश आवळे, सुरेश कडू पाटील, निवास लाड, प्रकाश पांडव, सुबोध सरोदे, अनिल पाटील, इंजि. समीर अमीन शेख, इंजि. अक्षय कराड, इंजि. गणेश श्रीराम, इंजि. वैष्णव मिसाळ, इंजि. अविनाश ओहळे, श्रीकांत लांडे पाटील, नितीन लवाळे, दिपेश कोलुरवार, अश्विन पवार, सिकंदर डांगे, कांतीलाल डुबल, कैलास लांडे, अन्वर अली, कौशिक देशमुख तसेच राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकार्यांनी दिली.










