पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील वडगाव सावताळ येथे जमिनीच्या वादातून एका ५२ वर्षीय महिला अंगणवाडी मदतनीसाला पती, सावत्र मुलगा, पुतण्या आणि एका अनोळखी इसमाने शेतात घुसून लाकडी दांडके व लोखंडी पान्हा याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संगिता बाबाजी जांभळकर (वय ५२, रा. वडगाव सावताळ) यांच्यावर अहिल्यानगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, त्यांनी पोलिसांत जबाब नोंदवला आहे. फिर्यादी संगिता जांभळकर या वडगाव सावताळ येथे एकट्या राहून भोंद्रे येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. त्यांचे पती बाबाजी जांभळकर यांनी दुसरे लग्न केले असून ते जवळच राहतात. पतीने संगिता यांना उदरनिर्वाहासाठी गट नंबर ७९६ मध्ये दीड एकर जमीन दिली आहे, तर उर्वरित जमिनीच्या वाटपाचा दावा पारनेर कोर्टात सुरू असल्याने त्यांच्यात वाद आहे.
१४ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास संगिता या शेतात असताना पती बाबाजी जांभळकर, सावत्र मुलगा राहुल, पुतण्या शैलेश आणि त्याचा एक अनोळखी मित्र तिथे आले. राहुलने ट्रॅटरने संगिता यांची दीड एकर जमीन नांगरण्यास सुरुवात केली. संगिता यांनी विरोध करत समजावण्याचा प्रयत्न केला असता, चौघांनी त्यांना शिवीगाळ केली. राग अनावर झाल्याने राहुलने लाकडी दांडयाने तर शैलेशने लोखंडी पान्ह्याने संगिता यांना बेदम मारहाण केली. तसेच पती बाबाजी व अनोळखी मित्राने लाथाबुक्क्यांनी मारले.
मारहाण सुरू असतानाच राहुलने संगिता यांचा मोबाईल आणि शैलेशने गळ्यातील सोन्याचे पोत जबरदस्तीने हिसकावून घेतले. गाव सोडून गेली नाहीस, तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही त्यांनी दिली. संगिता चक्कर येऊन पडल्यानंतर त्यांच्या मुलीने त्यांना रुग्णवाहिकेतून आधी टाकळी ढोकेश्वर व नंतर अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. त्रास वाढल्याने त्यांना हराळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.










