मुंबई / नगर सह्याद्री :
यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये जर तुम्ही एसटीने जाण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने सुट्टीचा हंगाम लक्षात घेता १५ एप्रिलपासून १० टक्के हंगामी भाडेवाढीसह प्रति तिकिटामागे दोन रुपये असा स्वच्छता अधिभार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उन्हाळी भाडेवाढ ही केवळ दोन महिन्यांसाठी असून स्वच्छता अधिभार हा कायमस्वरूपी असणार आहे. एसटी महामंडळाकडे सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे एसटी गाड्यांसह, स्थानके आणि आगार स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
ही दरवाढ विशेषत: साधी बस म्हणजे लाल परी, मिडी बस, जलद देवा आणि रात्रसेवा देणार्या गाड्यांसाठी लागू असेल. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता प्रौढ प्रवाशांसाठी बसेसच भाडे प्रति टप्पा हा 12 रुपये असेल आणि लहान मुलांसाठी हे भाडे 7 रुपये ठरवण्यात आले आहे.
१५ एप्रिल ते १५ जून या कालावधीसाठी एसटीची भाडेवाढ लागू
१५ एप्रिल ते १५ जून या कालावधीसाठी एसटीची भाडेवाढ लागू होणार आहे. भाडेवाढ केवळ साध्या बसगाड्यांसाठी असेल. भाडेवाढीतून हिरकणी, शयनयान, शिवशाही, जनशिवनेरी, शिवनेरी या गाड्यांसह ई-बस गाड्यांना वगळण्यात आले आहे.
तसेच महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि अन्य सवलतधारी प्रवाशांना हा अधिभार लागू असणार नाही. आवडेल तेथे प्रवास योजनेंतर्गत चार आणि सात दिवसांचा पास देण्यात येतो. अशा प्रवाशांसाठी पाच रुपये अधिभार असणार आहे. पास देताना प्रवाशांकडून ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
प्रवास ९० ते १०० रुपयांनी महागणार
आगाऊ आरक्षणातून काढलेल्या पासवर स्वच्छता अधिभार असणार नाही. एसटीच्या बसगाड्या भाडेतत्त्वाने घेणाऱ्यांना प्रति बस ५० रुपये इतका अधिभार द्यावा लागणार आहे, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्याचा प्रवास ९० ते १०० रुपयांनी महागणार आहे.
दरम्यान, गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याची एसटी महामंडळाला परवानगी आहे. त्यानुसार गर्दीच्या हंगामात तात्पुरत्या स्वरूपाची भाडेवाढ केली जाते. गेल्यावर्षी दिवाळीमध्ये एसटी महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ नागरिकांच्या रोषामुळे रद्द केली होती.










