भालगाव येथे दोन चोर अटकेत, दोन फरार
खरवंडी कासार | नगर सह्याद्री
भिक्षूकाचा वेश धारण करीत येऊन भर दिवसा घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रकार पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथे घडला. दि. 7 जुलै रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास भालगाव येथे ही घटना घडली. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे पळून जाणाऱ्या चौघा दरोडेखोरांमधून दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
फिर्यादी कोमल गोरख खेडकर यांनी फिर्याद दाखल केली. कोमल खेडकर घरासमोर एकटीच काम करीत असताना दरम्यान भगवे कपडे परिधान केलेले चार अनोळखी इसम भिक्षा मागण्याच्या नावाखाली घरी आले. नंतर कोमल शिधा देण्यासाठी घरात गेली असता चोरट्यांनी त्यांच्याच मागे घरात प्रवेश करून तीस हजार रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबडून घेतले. यावेळी आरडाओरडा झाला असता शेजारील चार ते पाच युवक पळत आले. त्यांनी पाठलाग करून दोन जणांना पकडले असता भास्करराव गणपत चव्हाण (वय 60) व त्यांचा अल्पवयीन मुलगा (रा.अंबड जि.जालना) या दोन आरोपींना जागीच पकडले. इतर दोन आरोपी मुद्देमालासह फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पाथड पोलीस स्टेशनचे पथक दाखल झाले. चोरी, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.










