राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील विलंबामुळे सर्वपक्षीय बंद; व्यापार्यांचाही उत्स्फूर्त पाठिंबा
जामखेड | नगर सह्याद्री
जामखेड शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी वरील अतिक्रमणाचा प्रश्न अद्यापही मार्गी न लागल्याने जामखेडमध्ये आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिलेल्या आश्वासनाची मुदत संपूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांच्या वतीने आज शुक्रवार (दि. ६) पासून जामखेड शहर कडकडीत बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळपासूनच शहरातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी या आंदोलनाला मोठा प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद ठेवली. अतिक्रमणे हटवून महामार्गाची अधिकृत हद्द निश्चित करण्याच्या मागणीसाठी व्यापार्यांनीही आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता सुजित चेमटे यांनी ५ मार्चपर्यंत महामार्गाची अधिकृत हद्द निश्चित करून अतिक्रमणाबाबत कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर २६ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आलेला जामखेड बंद मागे घेण्यात आला होता. मात्र, ठरलेल्या मुदतीपर्यंत कोणतीही प्रक्रिया सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
जामखेड शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ डीचे काम गेल्या साडेतीन वर्षांपासून सुरू असून ते अत्यंत संथगतीने सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. रस्त्याच्या कामात अतिक्रमण हा सर्वात मोठा अडसर ठरत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे वाहतुकीत मोठा गोंधळ निर्माण होत असून, शहरात अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत. काहीजण जखमी झाले तर काहींना आपला जीवही गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
या प्रश्नांवर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी यापूर्वीही अनेक आंदोलने केली आहेत. प्रशासकीय पातळीवर बैठका घेण्यात आल्या असून, जिल्हाधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने जामखेडकरांनी अखेर पुन्हा एकदा सर्वपक्षीय बेमुदत बंदचे हत्यार उचलले आहे.दरम्यान, अतिक्रमणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत आणि महामार्गाची अधिकृत हद्द निश्चित होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे जामखेड शहरातील दैनंदिन व्यवहार आणि व्यापारावर याचा मोठा परिणाम होण्याची शयता व्यक्त होत आहे.










