राजूर | नगर सह्याद्री
भंडारदरा परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून धरण साठा 92.02 टक्के पर्यंत पोहोचला आहे. धरणातील पाणी साठा नियंत्रित ठेवण्यासाठी स्पीलवे गेट मधून 7176 क्यूसेसने पाणी सोडणेत आले आहे. प्रवरा नदी दुथडी भरून वाहू असून रंधा धबधबा येथे मनमोहक निसर्ग सौदर्य पहावयास मिळत आहे.
निळवंडे धरण ही 94.77 टक्के भरले आहे. धरण साठा नियंत्रित राहण्यासाठी धरणातून 13085 क्युसेस पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदी प्रवाहित झाली आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कचा इशारा दिला आहे. तालुक्यातील भंडारदरा आणि परिसरात रविवारी रोजी सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळख असणाऱ्या घाटघर येथे 92 मीमी पावसाची नोंद झाली आहे. रतनवाडी 123 मीमी, पांजरे 61 मीमी, भंडारदरा 90 मीमी पावसाची झाल्याची नोंद आहे.तसेच धरण साठा नियंत्रण ठेवण्यासाठी शाखा अभियंता सागर ढोकणे सह वसंत भालेराव, बाळू खाडे, गोविंद बर्थड, सुरेश हंबीर, चंदर खडके सर्व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. तसेच राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक किशोर पवार व पोलीस कर्मचारी कुठेही अनुचित प्रकार पर्यटकांकडून होऊ नये म्हणून लक्ष ठेवून आहेत.
मुळाचा पाणीसाठा 60 टक्क्यांवर
राहुरी | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्याची जलसंजीवनी समजल्या जाणाऱ्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन झाल्याने धरणात नवीन पाण्याची आवक सुरु झाली आहे. नवीन पाण्याची आवक 12,041 क्युसेकने सुरू होती. कोतुळ कडून येणाऱ्या पाण्यामुळे मुळा नदीला पूर आला आहे.
सकाळी सहा वाजता मुळा धरणाचा साठा 15,432 एमसीएफटी (59.35%) आहे. जलसंपदा विभागाचा पूर नियंत्रण कक्ष सध्या धरणाच्या पाणी पातळीवर व येणाऱ्या पाण्याच्या आवकवर लक्ष देऊन आहे.

जून महिन्यात मुळा धरणाची पातळी अतिशय खालावली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुद्धा बिकट अवस्था झाली होती. परंतु धरणातील पाणीसाठा आता समाधानकारक झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची अडचण काहीशी दूर होण्याचे संकेत आहेत. धरणात पाणीसाठा वाढल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, मुळा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी पी. व्ही. पाटील व शाखा अभियंता राजेंद्र पारखे व अन्य कर्मचारी वृंद मुळा धरणात येणाऱ्या पाण्याच्या स्थितीकडे लक्ष ठेऊन आहेत.










