भेंडा | नगर सह्याद्री
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले पाटील तर उपाध्यक्षपदी सुधाकर (काकासाहेब) नारायणराव नरवडे पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांची निवडणूक यापूवच माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली होती. त्यानंतर मंगळवारी (दि. 30 जून) कारखान्याच्या अतिथीगृहात निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार, संचालक पंडितराव भोसले, डॉ.नारायण म्हस्के, जनार्धन कदम, अशोकराव मिसाळ, मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी, ॲड. हिम्मतसिंह देशमुख, अमोल अभंग, विकास नन्नवरे, संतोष पावसे, जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, प्रसाद पटारे, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, बाळासाहेब खरड, सुमनबाई काळे, रंजना तानवडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देविदास घोडेचोर, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी उपस्थित होते.निवडीनंतर बोलताना अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील म्हणाले, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना हा शेतकरी व कामगारांची कामधेनू असून, कारखान्याच्या माध्यमातून महसूल निर्मिती करून शेतकरी-कामगारांच्या घरात लक्ष्मी पोहोचविण्याचे काम होत आहे. लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी सुरू केलेली शेतकरी, कामगार व कष्टकऱ्यांच्या हिताची परंपरा पुढेही कायम ठेवली जाईल.
ते पुढे म्हणाले की, संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 250 इच्छुकांनी अर्ज भरले होते. मात्र संघटनेवर विश्वास ठेवून सर्वांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यासाठी माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार विठ्ठलराव लंघे तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते व सभासदांचे सहकार्य लाभले. सर्वांना सोबत घेऊन कारखान्याच्या माध्यमातून रचनात्मक विकासकामांना गती दिली जाईल. राज्यातील साखर उद्योगात ज्ञानेश्वर कारखान्याने वेगळी ओळख निर्माण केली असून, चंद्रशेखर घुले पाटील यांना राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदाची मिळालेली संधी ही कारखान्याच्या चांगल्या कारभाराची पावती असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार, संचालक मंडळातील सदस्य, अधिकारी व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. नवनिर्वाचित उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे पाटील आणि माजी आमदार पांडुरंग अभंग यांनीही मनोगत व्यक्त केले.अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर सर्व संचालकांनी लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केले. त्यानंतर विविध संस्था व कार्यकर्त्यांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार संचालक पंडितराव भोसले यांनी मानले.










