- जाहिरात -spot_img
breaking news

सप्ताहाच्या पंगतीत राडा, नागापुरातून केबलची चोरी, ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, कुठे काय घडलं पहा..

एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –

शहरातील नागापूर उपनगरातील कातोरे वस्ती परिसरातून अज्ञात चोरट्यांनी बांधकामाच्या ठिकाणाहून तब्बल २ लाख ६० हजार रुपये किमतीच्या कॉपर केबल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

​याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी राहुल लक्ष्मण कातोरे यांचे नागापूर येथील कातोरे वस्ती परिसरात नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. घराच्या वीज जोडणीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात ‘पॉलीकॅब’ आणि ‘आर.आर.’ कंपनीच्या तांब्याच्या वायर आणून ठेवल्या होत्या. काही केबल घरामध्ये ठेवल्या होत्या, तर काही भिंतींमध्ये बसवल्या होत्या. ७ एप्रिलच्या रात्री ते ९ एप्रिलच्या सकाळच्या दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोरट्याने या बांधकामाच्या ठिकाणी प्रवेश केला.

​चोरट्याने संधी साधून घरातील २ लाख ६० हजार रुपये किमतीच्या विविध रंगांच्या कॉपर केबल चोरून नेल्या. चोरीचा हा प्रकार लक्षात येताच कातोरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आदिनाथ चोरटे व अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बमने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी राकेश खेडकर करत आहेत. शहरात वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सप्ताहाच्या पंगतीत राडा; बाप-लेकावर हल्ला करणाऱ्या तिघांवर गुन्हा
​अहिल्यानगर: तालुक्यातील साकेवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या जेवणाच्या पंगतीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून बाप-लेकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी अविनाश लहानू पालवे, योगेश अंबादास पालवे आणि सतीश लहानू पालवे (सर्व रा. साकेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​अनिल पांडुरंग पालवे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. सप्ताहाच्या पंगतीत पाण्याची कळशी घेतल्याच्या कारणावरून अविनाश पालवे याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली होती. याचा जाब विचारला असता, आरोपीने लाकडी काठीने फिर्यादीच्या हातावर प्रहार केला. इतक्यावरच न थांबता आरोपीने फिर्यादीचा मुलगा आदित्य याच्या डोक्यात विटाने मारून त्याला जखमी केले.
​या भांडणात योगेश पालवे आणि सतीश पालवे यांनीही फिर्यादीला शिवीगाळ करत त्यांची दुचाकी लाथ मारून खाली पाडली व गाडीचे नुकसान केले. ‘पुन्हा आमच्या नादाला लागलात तर हातपाय तोडू’, अशी धमकी देऊन आरोपींनी दहशत निर्माण केली. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी मारहाण आणि धमकी दिल्याबद्दल गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सुशांत दिवटे करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  सिंहासनावर विराजमान होणार श्री काळभैरवनाथ... पुणेवाडीत श्री काळभैरवनाथ मूर्तीला वज्रलेप;

देहरे येथे महिलेचा विनयभंग; तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: कामावरून घरी परतणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना देहरे शिवारात घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी नामदेव बाजीराव पिंपळे, अरुण बाजीराव पिंपळे आणि योगेश बबन शेळके (सर्व राहणार देहरे, ता. जि. अहिल्यानगर) यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आपले काम संपवून घरी परतत होती. त्यावेळी शेताच्या रस्त्यावर आरोपी जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदत होते. पीडितेने आरोपी नामदेव पिंपळे याला रस्त्यावर खड्डा का घेतो, असे विचारले असता त्याने चिडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीने महिलेचा साडीचा पदर ओढून तिचा हात धरला व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
​या घटनेनंतर आरोपींनी पीडितेस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि ‘पुन्हा या रस्त्याने गेलात तर जीवे ठार मारू’ अशी धमकी दिली. या प्रकारानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३४ आणि ३ (५) नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार थोरात करत आहेत.

केडगाव बायपासवर ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
​अहिल्यानगर –
अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील केडगाव बायपास परिसरात एका भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ७ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कांदा मार्केट रडवरील निल हॉटेलजवळ घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष विठ्ठल जाधव यांचे वडील रस्ता ओलांडत असताना हरियाणा पासिंगच्या ट्रकने (क्रमांक एच आर ३८ ए एल ००७०) त्यांना जोरदार धडक दिली. चालक जाकीर मोहंमद यासीन याने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने आणि अविचाराने चालवून समोरून येणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केले. या भीषण अपघातात जाधव यांच्या वडिलांना गंभीर दुखापत झाली, जी त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली.

हे सुद्धा वाचा :  भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठे खुलासे होणार; जिल्ह्यातील प्रत्येक वादात ‘तो’च लोकप्रतिनिधी का दिसतो?, सुजय विखे काय म्हणाले पहा

​अपघातानंतर नातेवाईकांनी फिर्याद देण्यास वेळ घेतल्याने हा गुन्हा ९ एप्रिल रोजी नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गाजरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपी चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून धोकादायक रितीने वाहन चालवल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये कारवाई सुरू केली आहे. शहर परिसरात वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

वाळकीत सामाईक विहिरीच्या वादातून महिलेला काठीने मारहाण
​अहिल्यानगर: सामाईक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका महिलेला अडवून तिला लाकडी काठीने व लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी येथे घडली आहे. याप्रप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी अशोक दादाराम झोंड याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, धनगरवाडी परिसरातील एका शेतात पीडित महिला पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी अशोक झोंड याने तिला विहिरीवर येण्यास मज्जाव केला. ही विहीर सामाईक असल्याचे सांगत महिलेने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग आल्याने आरोपीने महिलेला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन आरोपीने जवळच पडलेल्या लाकडी काठीने महिलेच्या डोक्यावर आणि डाव्या खांद्यावर जोरात प्रहार करून तिला जखमी केले.

​मारहाण केल्यानंतर आरोपीने पीडितेसह तिच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडित महिलेने नगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भादंविच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार गुंजाळ करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात विहिरीच्या वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ