टाकळी ढोकेश्वर उपबाजार समितीचा वनवास संपेना; जुन्या जागांच्या घोटाळ्यावरून स्थानिकांचे प्रश्नचिन्ह
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळी ढोकेश्वर येथील उपबाजाराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला असून, आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. टाकळी ढोकेश्वर येथील गट नंबर 962 मधील गायरान जमिनीपैकी 5 एकर जागा उपबाजार समितीसाठी उपलब्ध करून देण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुधवारी भूमिअभिलेख कार्यालयाकडून या जागेची मोजणी पूर्ण करण्यात आली. मात्र, या मोजणीला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविल्यामुळे सौरऊर्जा प्रकल्पापाठोपाठ आता ही 5 एकर जागाही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
टाकळी ढोकेश्वर येथील शासकीय गायरान क्षेत्रात एकूण 23 एकर जागा शिल्लक असल्याची माहिती आहे. या जागेवर उपबाजार समिती उभारण्यासाठी 5 जून 2023 रोजी बाजार समितीच्या वतीने एकमताने ठराव मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव पणन महामंडळाकडे पाठवल्यानंतर, संबंधित विभागाच्या परवानग्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने भूमिअभिलेख विभागाला मोजणीचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी मोजणी प्रक्रिया पार पडली.
परंतु, या प्रक्रियेला ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय निवडुंगे, अंकुश पायमोडे, मळीभाऊ रांधवन, संकेत झावरे, बबलू झावरे, अशोक पायमोडे, किसन धुमाळ या लोकप्रतिनिधींसह स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या उपबाजार समितीला जागा मिळवताना पुन्हा एकदा स्थानिक ग्रामस्थांच्या ‘अग्निपरीक्षेला’ सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. टाकळी ढोकेश्वर उपबाजार समितीची साडेसाती संपायला तयार नाही, अशीच सध्याची स्थिती आहे. वास्तविक पाहता, नगर-कल्याण महामार्गावर उपबाजार समितीची गट नंबर 164 मध्ये अडीच एकर हक्काची जागा उपलब्ध आहे.
मात्र, या जागेला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने ती जागा आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. रस्ता नसताना ही जागा बाजार समितीने घेतलीच कशी? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एकीकडे कोट्यवधींची हक्काची जागा कायदेशीर कचाट्यात आणि विक्रीच्या वादात अडकलेली असताना, दुसरीकडे नवीन गायरान जमिनीच्या मोजणीला ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे टाकळी ढोकेश्वर उपबाजार समितीचा वनवास संपणार कधी, हा प्रश्न कायम आहे.
पणन महामंडळ आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मोजणी
टाकळी ढोकेश्वर व परिसरातील शेतकऱ्यांना भाजीपाला आणि कांदा विक्रीसाठी जुन्नर, नारायणगाव किंवा अहिल्यानगर येथे जावे लागते. या भागातील व भाळवणी परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी, शेतीमालाची स्थानिक पातळीवर खरेदी व्हावी म्हणून ही प्रलंबित उपबाजार समिती सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पणन महामंडळ आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानेच ही मोजणी झाली आहे. या उपबाजारामुळे स्थानिक बाजारपेठेचा विस्तार होईल आणि ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही मोठी भर पडेल.
– गंगाराम बेलकर, सभापती, बाजार समिती, पारनेर
नवीन जागा शोधण्याची वेळ?
टाकळी ढोकेश्वर येथील मुख्य वासुंदा चौकातील गट नंबर 842/1 मधील कोट्यवधी रुपये किमतीची जागा तत्कालीन संचालक मंडळाने प्रशासक राजवटीच्या काळात परस्पर विकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आज या जागेवर दोन-तीन मजली इमारती आणि आलिशान बंगले उभे राहिले आहेत. या संदर्भातील न्यायालयीन लढाईत बाजार समि तीने माघार घेतल्यामुळे समितीला आपली हक्काची जागा गमवावी लागली आहे. स्वतःची मोक्याची जागा गमावल्यामुळेच आता बाजार समितीवर नवीन जागा शोधण्याची वेळ आली आहे.










