- जाहिरात -spot_img
breaking news

शिवसेना शेतकऱ्यांच्या बांधावर…काय नुकसान झालं

 पावसामुळे जवळ्यात फळबागा उद्ध्वस्त
पाच मेंढ्यांचा मृत्यू, जिल्हाप्रमुख दळवी यांनी अधिकाऱ्यांना केल्या पंचनाम्याच्या सूचना
पारनेर | नगर सह्याद्री

तालुक्यातील जवळा आणि परिसरात वादळी पावसामुळे झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगर दक्षिणचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी आणि पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. जिल्हाप्रमुख दळवी यांनी तातडीने संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना फोन करून तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

या धावत्या भेटीदरम्यान शहरप्रमुख नीलेश खोडदे, युवासेना तालुका संघटक आदिनाथ कदम, शिवसेना तालुका समन्वयक मंगेश सालके, सरपंच रामदास खोसे, सहसंघटक वैभव ठुबे यांच्यासह स्थानिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेल्या दोन दिवसांपूव जवळा परिसरात अचानक आलेल्या वादळी पावसाने संपूर्ण परिसराला झोडपून काढले. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की अनेक झाडे उन्मळून पडली, तर घरांवरील पत्रे हवेत उडून गेले. माळवाडी येथे एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली मेंढपाळ महिला आणि लहान मुले आपल्या मेंढ्यांसह आडोशाला थांबली असताना अचानक ते झाड कोलमडले. सुदैवाने माणसे बाजूला पळाली, परंतु झाडाखाली चिरडून पाच मेंढ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील केळी, डाळिंब, द्राक्षे, पपई, कारले, मका आणि कांदा चाळींचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून उभ्या फळबागा भुईसपाट झाल्या आहेत.लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला पंचनाम्यांचे आदेश देऊनही दोन दिवस उलटून गेले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. केवळ तलाठी आणि कृषी सहाय्यक यांनी जुजबी पाहणी करून अहवाल पाठवू, अशी भूमिका घेतल्याने हवालदिल झालेला स्थानिक शेतकरी कमालीचा संतप्त झाला आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी शिवसेना स्टाईलने भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा दिला.

शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडणार
जवळा परिसरात वादळी पावसामुळे बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे. फळबागा उद्ध्वस्त झाल्या असून मेंढपाळांचेही मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटसमयी प्रशासकीय अधिकाऱ्यांची संवेदनशीलता कुठे गायब झाली आहे? दोन दिवस उलटूनही पंचनामे न होणे हा शेतकऱ्यांचा छळ आहे. प्रशासनाने तात्काळ एसी केबिनमधून बाहेर पडून जागेवर पंचनामे करावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
-डॉ. श्रीकांत पठारे, तालुकाप्रमुख, शिवसेना

हे सुद्धा वाचा :  पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला मोठे आवाहन; असे का म्हणाले पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ