सारसनगर येथे तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करत लुटले; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
पैसे उसने देण्यास नकार दिल्याने एका तरुणाला दारूच्या नशेत शिवीगाळ व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. मारहाण केल्यानंतर आरोपींनी तरुणाच्या खिशातील रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सारसनगर येथील यश अपार्टमेंटसमोरील पुलाजवळ घडली असून, या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शुभम अनिल हराळ या २६ वर्षीय विद्यार्थ्याने या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी मयुर छबुराव कांडेकर आणि गोट्या रासकर (दोघे रा. सारसनगर, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम हा सारसनगर भागातून जात असताना दोन्ही आरोपी दारू पिऊन त्या ठिकाणी आले. ‘तू बरेच दिवस झाले मला भेटला नाहीस’ असे म्हणून आरोपी मयुर याने शुभमकडे दोन हजार रुपये उसने मागितले. शुभमने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगताच आरोपींचा पारा चढला.
पैसे न दिल्याच्या रागातून आरोपींनी शुभमला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपी मयुर याने हातातील लाकडी दांडक्याने शुभमच्या पाठीवर आणि हातावर जोरात प्रहार केले, तर त्याचा साथीदार गोट्या रासकर याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपी मयुर याने शुभमच्या खिशातील दोन हजार रुपयांची रोकड आणि एक हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. ‘या घटनेबाबत जर कोणाला सांगितले, तर तुला जिवे मारून टाकीन’ अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या मारहाणीनंतर जखमी शुभमने भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी फिर्यादीच्या रुग्णालयातील जबाबावरून गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात करत आहेत.
अहिल्यानगरमध्ये लग्नकार्यात वाद; विनयभंग व अॅसिड हल्ल्याची धमकी
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरातील एका लॉन्समध्ये लग्नकार्यादरम्यान सासरच्या आणि माहेरच्या लोकांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका महिलेचा विनयभंग करून अॅसिड टाकून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या कुटुंबासह नाशिक येथून अहिल्यानगरमधील एका लग्नकार्यासाठी आली होती. पीडित महिलेच्या नणंदेचा तिच्या पतीसोबत कौटुंबिक वाद सुरू असल्याने ती सध्या नाशिक येथेच राहत आहे. लग्नाचा समारंभ सुरू असताना, नणंदेचा पती तेथे आला आणि आपल्या तीन वर्षांच्या मुलाला ताब्यात देण्याची मागणी करू लागला. पीडितेच्या सासर्यांनी त्याला समजावून सांगत नंतर नाशिकला येण्यास सांगितले. याचा राग आल्याने त्याने बाहेर येण्याची धमकी दिली.
रात्री जेवण झाल्यानंतर पीडित महिला मुलाला सोबत घेऊन गाडी पार्क केलेल्या ठिकाणी जात असताना, नणंदेच्या पतीने तिचा रस्ता अडवला. त्याने मुलाला जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केला असता, त्याने पीडित महिलेला अश्लील शिवीगाळ केली. तसेच पीडितेशी झटापट करून विनयभंग केला. ‘जर मुलगा माझ्या ताब्यात दिला नाही, तर तुमच्यावर अॅसिड टाकून जाळून टाकीन,’ अशी धमकी त्याने दिली. यावेळी आरोपीच्या वडिलांनीही तेथे येत पीडितेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी साकीब साजीद खान आणि साजीद शाकीर खान (दोघे राहणार मुकुंदनगर, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गणेश साठे पुढील तपास करत आहेत.
केडगावमध्ये जुन्या वादातून तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला
अहिल्यानगर: केडगाव येथील तिरंगा चौकातील मोकळ्या पटांगणात जुन्या वादातून एका १७ वर्षीय तरुणाला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव राहुल रजपुत (वय १७, रा. वैष्णवनगर, केडगाव) हा तरुण १८ मे रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास तिरंगा चौकातील पटांगणात मित्रासोबत गप्पा मारत बसला होता. त्या वेळी भूषणनगर येथील तन्मय मगर, आतिष उरमुडे आणि यश कोतकर हे तिघे तिथे आले. त्यांनी जुन्या क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून वाद उकरून काढला. आरोपींनी गौरवला अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गौरवला गंभीर दुखापत केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
या हल्ल्यानंतर जखमी गौरववर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर गौरवने १९ मे रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिली. पोलिसांनी तन्मय मगर, आतिष उरमुडे आणि यश कोतकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार संतोष लगड करत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिकाचा उपचारादरम्यान मृत्यू; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहिल्यानगर: अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखेचे लिपिक प्रशांत सखाराम पाटोळे (वय ४०, राहणार जेऊर बायजाबाई) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास प्रशांत पाटोळे हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली होती.
या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू होते. मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते सतत बिछान्यावरच होते, मात्र १३ मे रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. फिर्यादी पुष्पा सखाराम पाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा लहान मुलगा अमोल हा प्रशांत यांच्या उपचाराची देखरेख करत होता, परंतु ७ एप्रिल रोजी त्याचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दोन तरुण मुलांच्या मृत्यूच्या या धक्कादायक आघातामुळे कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला होता, ज्यामुळे तक्रार देण्यास उशीर झाला. अपघातानंतर जखमीला मदत न करता पळून गेलेल्या अज्ञात चालकाचा शोध सहायक पोलीस निरीक्षक गॉटला आणि पोलीस अंमलदार गरड करत आहेत.
शेजाऱ्यांच्या वादातून घरात घुसून तोडफोड; अहिल्यानगर येथील एमआयडीसी भागात तिघांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर:
शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी जुन्या वादातून घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून अश्लील शिवीगाळ केली, तसेच घरातील सामानाचे व कुंडीचे नुकसान करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना एमआयडीसी जिमखाना जवळील स्ट्रॉबेरी प्री-प्रायमरी स्कूल परिसरातील एका निवासी प्लॉटमध्ये घडली. तक्रारदार आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत. १५ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास हा वाद झाला. आरोपी लिलाबाई आंबेडकर, मंगल आंबेडकर आणि राजेंद्र आंबेडकर (सर्व राहणार वडगाव गुप्ता, तालुका जिल्हा अहिल्यानगर) यांनी संगनमत करून तक्रारदाराच्या घराच्या आवारात प्रवेश केला.
त्यानंतर आरोपींनी घरात घुसून साहित्याची फेकाफेक करत नुकसान केले. या गोंधळात घराबाहेर ठेवलेल्या कुंड्यांचीही तोडफोड करण्यात आली. तक्रारदाराने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांना अत्यंत अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि थेट जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पोबारा केला.
या घटनेनंतर तक्रारदाराने एमआयडीसी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी लिलाबाई आंबेडकर, मंगल आंबेडकर आणि राजेंद्र आंबेडकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९, ३३३, ३५२ आणि ३५१ नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नरोटे करत आहेत.
अहिल्यानगरमध्ये किराणा दुकानात शिरून महिलेसह नातेवाईकांना मारहाण
अहिल्यानगर: शहरातील पिंपळगाव माळवी परिसरामध्ये एका किराणा दुकानात शिरून एका महिलेचा विनयभंग करत तिच्यासह नातेवाईकांना लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या कुटुंबासह पिंपळगाव माळवी भागात राहते. गावातीलच एका किराणा दुकानात ती आपल्या नातेवाईकांसह उपस्थित असताना, पूर्ववैमनस्यातून आरोपी अंकुश वसंत घोरपडे, वसंत एकनाथ घोरपडे, अर्चना शेवाळे आणि माधुरी राजेंद्र घोरपडे (सर्व रा. आढाववाडी व वडगाव गुप्ता) हे त्या ठिकाणी आले. आरोपींनी दुकानात प्रवेश करून पीडित महिलेसोबत अत्यंत गैरवर्तन केले.
या घटनेला विरोध केला असता, आरोपींनी पीडितेसह तिच्या वृद्ध सासऱ्यांना आणि वाचवण्यासाठी आलेल्या अन्य एका नातेवाईकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत वृद्ध सासरे खाली कोसळले. आरोपींनी सर्वांना जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. या घटनेनंतर पीडितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. पोलिसांनी नवीन भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी आणि पोलीस हवालदार सचिन अडबल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दारू पिण्यास पैसे न दिल्याने मजुराला दगडाने मारहाण; रेल्वे स्टेशन परिसरातील घटना
अहिल्यानगर: शहरातील रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका मजुराला दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण गोविंद राठोड (वय २७, रा. यवतमाळ) हे मजूर म्हणून काम करतात. १७ मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास ते रेल्वे स्टेशन परिसरातील चौकात थांबलेले होते. त्यावेळी आरोपी व्हिकी खरवडे (रा. रेल्वे स्टेशन जवळ, अहिल्यानगर) हा त्या ठिकाणी आला. आरोपीने फिर्यादी किरण राठोड यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, राठोड यांनी माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले.
या गोष्टीचा राग आल्याने आरोपीने त्यांना अद्वातद्वा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने हातामध्ये दगड घेऊन तो किरण यांच्या डोक्यात मारला. यामध्ये किरण हे गंभीर जखमी झाले. मारहाण केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
या घटनेनंतर जखमी मजुराला उपचारासाठी तातडीने पॅसिफिक हॉस्पिटल व त्यानंतर सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात मिळालेल्या जबाबावरून कोतवाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार भानुदास सोनवणे करत आहेत.










