सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरात कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसावर दुचाकीस्वाराने हात उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कायनेटीक चौकात ही घटना घडली असून, या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी सायंकाळी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार गणेश मोहन शिंदे हे कायनेटीक चौकात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावत होते. यावेळी दोन दुचाकीस्वार रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून वाद घालत होते. यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. हा वाद सोडवण्यासाठी हवालदार गणेश शिंदे यांनी मध्यस्थी केली असता, आरोपी अजित बाळासाहेब भोगाडे (वय २२, रा. साकत बु, ता. आष्टी, जि. बीड) याने पोलिसांशी हुज्जत घातली. त्याने हवालदार गणेश शिंदे यांची गचांडी धरून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली.
दरम्यान, घटनास्थळी उपस्थित इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत पोलिसाची सुटका केली. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे अंमलदार दिपक मिसाळ यांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपी अजित बाळासाहेब भोगाडे याच्यावर पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. भररस्त्यात पोलिसावर झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
वादातून महिलेला मारहाण; पिता-पुत्रावर गुन्हा
अहिल्यानगर: गुणवडी (ता. अहिल्यानगर) येथे शुक्रवारी रात्री उशिरा एका कौटुंबिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणात पीडित महिलेला मारहाण करून तिचा दात पाडल्याप्रकरणी पिता-पुत्रावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गुणवडी येथे संबंधित महिलेच्या पतीने नातेवाईकांशी केलेल्या शाब्दीक वादातून हे प्रकरण पेटले. यावेळी नाथा बाबा लांडगे आणि ऋषिकेश नाथा लांडगे यांनी पीडित महिलेला भिंतीवर ढकलून लाथाबुक्कीने बेदम मारहाण केली. पीडितेच्या नातेवाईकांनी जाब विचारण्यासाठी आरोपींच्या घरी असता, दोघांनी पुन्हा वाद घातला. यावेळी आरोपी ऋषिकेश याने हातातील कड्याचा वापर करून महिलेच्या तोंडावर जोरदार बुक्की मारली. यात पीडितेचा समोरचा उजव्या बाजूचा खालचा दात पडून गंभीर दुखापत झाली.
आरोपींनी ‘परत जर आमच्या वाटेला आलात, तर गाठ आमच्याशी आहे’ अशी धमकी देऊन घटनास्थळावरून पलायन केले. या गंभीर प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सपोनि गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ खरमाळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे अहिल्यानगर ग्रामीण भागात संताप व्यक्त होत असून आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे.










