सारिपाट / शिवाजी शिर्के –
राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीच्या नुकसानभरपाईची जवळपास दीड कोटी रुपयांची रक्कम मंजूर करून देण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे पुराव्यानिशी समोर आले असून त्यात श्रीगोंदा- पारनेर प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा देखील झाला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर हेच मुख्य आरोपी असून त्यांच्याच इशाऱ्यावर ही लाचखोरी झाली असल्याचे तक्रारदार आणि आरोपी यांच्यातील संभाषणातून स्पष्ट झाले असल्याने प्रांताधिकारी चिंचकर यांना आरोपी केलेच पाहिजे अशी मागणी श्रीगोंदा आणि पारनेरचे आमदार अनुक्रमे विक्रमसिंह पाचपुते आणि काशिनाथ दाते या दोघांनीही ‘नगर सह्याद्री’शी बोलताना केली. दरम्यान, चिंचकर यांच्याबाबत अनेक गंभीर तक्रारी यापूवच आल्या असल्याने आता याबाबत आम्ही दोघे मिळून मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही आ. पाचपुते आणि आ. दाते यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेला चिंचकरकडून छेद!
महसूल विभागात पारदश आणि तत्काळ काम माग लावण्याचा आगळावेगळा फंडा जिल्हाधिकारी पंकज आशिया यांंनी सुरू केला. सामान्य जनतेसह लोकप्रतिनिधींकडून देखील त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. भूसंपादनाचे मोबदले तत्काळ दिले पाहिजे आणि त्यात कोणतीही आडकाठी आणता कामा नये अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी आशिया यांनी दिल्या असताना त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे काम प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केले. चिंचकर यांच्या छुप्या आदेशानेच सव्वा लाखाची लाचखोरी समोर आली असल्याने आता चिंचकर यांच्याबाबत जिल्हाधिकारी काय अहवाल पाठवतात याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
प्रांताधिकारी चिंचकर याला आरोपी करा ः टिळक भोस
संपादीत करण्यात आलेल्या शेतजमिनीची नुकसानभरपाई देणे हे शासनाचे आणि शासकीय यंत्रणेचे कर्तव्य आहे. कोणताही अधिकारी हा त्याच्या खिशातून ही रक्कम देत नाही. शासनाने ठरवलेल्या निकषानुसार ही रक्कम दिली जाते. ती देताना अधिकारी टक्केवारी घेत असल्याचे श्रीकुमार चिंचकर यांच्या कृतीने स्पष्ट झाले आहे. चिंचकर यांच्यासाठी रक्कम स्वीकारत असल्याचे आरोपी आणि फिर्यादी दोघांनीही म्हटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणत्याही परिस्थितीत श्रीगोंदा- पारनेर विभागाचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना आरोपी केलेच पाहिजे. अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी याबाबत गडबड केल्यास या सर्वांच्या विरोधात न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा श्रीगोंदा येथील सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी दिला आहे.
चिंचकर, ढुमणे यांचे कॉल डिटेल्स तपासा!
प्रांताधिकारी असणारे श्रीकुमार चिंचकर यांच्या इशाऱ्यावरच ही लाचखोरी झाल्याचे स्पष्टपणे समोर आले असल्याने श्रीकुमार चिंचकर या प्रकरणात आरोपी का नाही असा थेट सवाल टिळक भोस यांनी उपस्थित केला आहे. आरोपीच्या पिंजऱ्यातील महसूल सहाय्यक ढुमणे आणि कंत्राटी कर्मचारी यांचे व प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांचे मोबाईल कॉल डिटेल्स काढण्याची मागणीही टिळक भोस यांनी केली आहे.
दोन भावांच्या अपिलाचे दोन वेगवेगळे निकाल!
जमिनीच्या वादाबाबत प्रांत कार्यालयात दावे दाखल होतात. त्यावर कायद्याच्या चौकटीत राहून निकाल देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात कायद्याचा कोलदांडा करत निकाल दिले गेले असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील दोन भावांच्या जमिनीच्या वादात याच श्रीकुमार चिंचकर याने एका भावाच्या बाजूने आणि त्यानंतर महिनाभरात दुसऱ्या भावाच्या बाजूने निकाल दिला आहे. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी म्हटले आहे.
… अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही ः आमदार काशिनाथ दाते
पारनेर हा सेनापती बापट आणि अण्णासाहेब हजारे यांचा क्रांतीकारी तालुका आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचे येथे कौतुकच केले जाते. मात्र,सामान्य जनतेला वेठीस धरुन कोणी असे गैरप्रकार करणार असतील तर त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी खमकी भूमिका पारनेरचे आ. काशिनाथ दाते यांनी ‘नगर सह्याद्री’शी बोलताना घेतली.
पालकमंत्री विखे पाटील लक्ष घालणार!ं
प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या आशिर्वादाने आणि त्याच्याच मागणीनुसार झालेल्या लाचखोरीच्या या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला. चिंचकर याच्या विरोधात सामाजिक संघटना देखील आता पुढे येऊ लागल्या आहे. आ. पाचपुते आणि आ. दाते या दोघांनीही चिंचकर याचे कारनामे पुढे आणले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची कधीच गय केली नाही. त्यामुळेच प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्याबाबत पालकमंत्री विखे पाटील काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










