अहिल्यानगर | नगर सह्याद्री –
अहिल्यानगर विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माघार घेण्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात हाय व्होल्टेज ड्रामा पहावयास मिळाला. अपक्ष उमेदवार करण ससाणे, कमलेश गांधी यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड होण्यासाठी दत्तात्रय पानसरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणे आवश्यक होते. परंतु पानसरे यांनी स्वतः उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही. ते तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून राजकीय ड्रामा पहावयास मिळाला. दरम्यान मी अर्ज मागे घेतलेला नाही. सुचकाने खोटी सही करुन अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला आहे. अर्ज मागे घेतला तर मी येथेच आत्मदहन करणार असल्याचा इशारा उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी देत जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या दिला.
शहाबाज सय्यद यांनी दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पानसरे यांनी शहाबाज सय्यद यांना दिलेल्या प्राधिकृत पत्रावर दत्तात्रय पानसरे यांची स्वतःची सही असल्याबाबत निवडणूक अधिकाऱ्याकडून खात्री करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचवेळी दत्तात्रय पानसरे हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. उमेदवारी अर्ज माघारीच्या अर्जावर खोटी सही करून अर्ज दाखल केल्याचा आरोप दत्तात्रय पानसरे यांनी केला आहे. त्यावेळी त्यांनी आत्महत्येचा इशारा दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात दिला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचे वातावरण तयार झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब नाहाटा यांनी पानसरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. प्राजक्त तनपुरे हे बिनविरोध झाले असल्याचा दावा महायुतीकडून केला जात आहे. परंतु प्रशासनाने मात्र अजून ते जाहीर केलेले नाही.
जिल्हाधिकाऱ्यांना दत्तात्रय पानसरे यांचे निवेदन
मी कोणाकडेही उमेदवारी माघारी घेण्याच्या अर्जावर सही केलेली नाही. तसेच कोणाला प्राधिकृत केलेले नाही. त्यामुळे कोणत्याही बनावट अर्जावर माझी आघार निश्चित करण्यात येवू नये. माझा अर्ज मंजूर करण्यात यावा अन्यथा मी आपल्या कार्यालसमोर आत्मदहन करणार असल्याचा अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी दिला आहे.
पुणे, कोकणसह विधान परिषद निवडणूक बिनविरोध, सत्ताधाऱ्यांचा मविआला जोरदार झटका; पाहा कुठे काय झालं?
जिल्हा परिषद निवडणुकीतील बिनविरोधचा ट्रेंड विधान परिषद निवडणुकीतही आल्याचे चित्र आहे. राज्यात १७ ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थ्येंच्या विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या आहेत. महायुती विरूद्ध मविआ असा थेट सामना राज्यात पुन्हा एकदा रंगलाय. पण यात महायुतीने मतदान होण्याआधीच ४ ठिकाणी बाजी मारली आहे. त्याशिवाय महायुतीला अनेक ठिकाणी बंडखोरी थांबवण्यातही यश आले आहे. दुसरीकडे मविआला मात्र जोरदार धक्का बसला आहे. आज अर्ज माघारी घेण्याच्या काही तास आधी ४ ठिकाणी विरोधकांच्या तलवारी म्यान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यात राष्ट्रवादीचा विजय –
पुणे विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनीही उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे विक्रम काकडे यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पक्षाने आदेश दिल्याने माघार घेत असल्याच श्रिकांत पाटील यांनी सांगितले. काल दिलीप वळसे पाटील शरद पवारांना भेटल्यानंतर झालेली महत्त्वाची घडामोड घडली आहे.
काँग्रेस उमेदवारची माघार, भाजपचा विजय –
वर्धा विधान परिषद मतदार संघातील काँग्रेसचे मविआचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे वर्धा गडचिरोली चंद्रपूर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाली. काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती आज प्रसार माध्यमांना दिली. त्यानंतर भाजपाचे अरुण लखानी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
यवतमाळमध्ये शिदेंच्या शिवसेनेचा बिनविरोध झेंडा-
यवतमाळ विधान परिषदेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला घवघवीत यश मिळाले आहे. यवतमाळची विधान परिषदेची जागा बिनविरोध झाली आहे. कारण, येथील सर्व उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले आहेत. शेवटच्या क्षणी भाजप बंडखोर नितीन भुतडा यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिंदेसेनेचे दृष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले. यवतमाळच्या विधान परिषदेच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध निवडणूक झाली आहे.
राणेंचा डाव, ठाकरे चितपट अन् राष्ट्रवादीचा विजय
मंत्री नितेश राणे यांच्या शिष्टाईमुळे कोकणातील जागाही बिनविरोध झाली. राणे यांनी बाळ माने यांची भेट घेऊन जिल्हाधिकार्यालयात नेलं.. बाळ माने यांनी थोड्यावेळापूर्वीच उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिकेत तटकरे यांचा विजय निश्चित झाला आहे. खासदार सुनील तटकरे यांनी महायुतीच्या सर्व आमदारांचे आभार मानले. अजित पवारांच्या पुण्याईमुळेच हा विजय मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
कोकणातील विधानपरिषदेची निवडणूक ही बिनविरोध झाली असून महाविकास आघाडीचे बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांची जवळजवळ बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. अनिकेत तटकरे यांना त्यांनी शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे आमचा विजय झाल्याचं त्यांनी म्हटलय. अनिकेत तटकरे यांना महायुती म्हणून ही जागा मिळाली असून राज्यात देखील महायुती म्हणून एकमेकांच्या विरोधात कोणी उभ राहू नये असा असला देखील त्यांनी दिलाय.
शेवटच्या तासात अर्ज मागे घेत उद्धव ठाकरेंना दिला मोठा धक्का; ‘या’ उमेदवाराची पक्षातून तात्काळ हकालपट्टी
राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघांच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाळ माने यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या निर्णयानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळ माने यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी केली आहे.
कोकण मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे गट) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बाळ माने निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, अर्ज माघारीच्या शेवटच्या काही तासांपूर्वी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, राज्याचे मंत्री नितेश राणे आणि बाळ माने हे एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर माने उमेदवारी मागे घेणार असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आणि काही वेळातच त्यांनी अर्ज मागे घेतल्याची अधिकृत घोषणा झाली.
संजय राऊत यांची घोषणा
शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून बाळ माने यांच्यावरील कारवाईची माहिती दिली. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांनी माने यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
बाळ माने हे मूळचे भाजपचे नेते होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेना (ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून मंत्री उदय सामंत यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. मात्र, मतदानापूर्वीच त्यांनी माघार घेतल्याने कोकणातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. महायुतीने ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात मोठा राजकीय धक्का दिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.










