नेवासा | नगर सह्याद्री –
नेवासा तालुक्यातील चांदा येथे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने डांबून ठेवलेल्या १३ गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने सुटका केली असून या कारवाईत २ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करत होते. दरम्यान, १५ मे रोजी रात्री सोनई पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना चांदा गावातील बसस्थानकासमोरील कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील काटवनात काही गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.
पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता १३ जिवंत गोवंशीय जनावरे चारा-पाण्याविना निर्दयतेने बांधून ठेवलेली आढळून आली. तसेच पत्र्याच्या शेडमध्ये गोमांसही सापडले. स्थानिकांकडे चौकशी केली असता ही जनावरे लियाकत इस्माईल कुरेशी, साजिद इस्माईल शेख व इतरांची असल्याची माहिती समोर आली.
या कारवाईत पोलिसांनी २ लाख १० हजार रुपये किमतीची १३ जिवंत जनावरे आणि ३३ हजार रुपये किमतीचे १५० किलो गोमांस असा एकूण २ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अवैध धंद्यांची माहिती नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या ०२४१-२४१६१११ किंवा डायल ११२ वर कळवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.










