चांदीची गदा, तीन लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस जिंकत विजेता
निघोेज | नगर सह्याद्री
पुणे येथील हनुमान आखाड्याचा पैलवान व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान माऊली कोकाटे हा कन्हैया केसरीचा मानकरी मानकरी ठरला. चांदीची गदा व ३ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस जिंकत त्याने नामवंत पै. अजय बलवान याचा पराभव केला आहे. कन्हैया दूध उद्योग समूहाचे संस्थापक शांताराम मामा लंके यांच्या स्मरणार्थ निघोज येथे भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्याहस्ते पहिली कुस्ती लावून कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्यातील पन्नासपेक्षा जास्त नामवंत पैलवानांनी सहभागी होऊन तब्बल १५ लाख रुपयांची बक्षिसे जिंकली आहेत. कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मच्छिंद्रशेठ लंके व त्यांच्या सहकार्यांनी या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. तब्बल चार एकर परिसरात कुस्तीसाठी मैदान तयार करण्यात आले होते. सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत कुस्तीचा सिलसिला सुरू होता. यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत ३ लाख ५१ हजार रुपये बक्षीस व चांदीची गदा मिळवण्याचा मान पुणे येथील हनुमान आखाड्याचा पैलवान उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे याने मिळवला आहे. दुसर्या क्रमाकांची २ लाख ५१ हजार रुपयांची कुस्ती पुणे येथील शिवराम दादा तालीम मंडळाचा पैलवान सुदर्शन कोतकर व आर्मी सेंटर पुणे येथील पैलवान सुरज चौधरी यांच्यात झाली. यामध्ये सुदर्शन कोतकर हा पैलवान विजयी झाला. तिसरी कुस्ती १ लाख ५१ हजार रुपयांची झाली प्रमोद सुळ व बालाजी खरात यांच्यात झालेल्या या कुस्तीत शिवराम दादा तालीम मंडळाचा बालाजी खरात विजयी झाला. या प्रमुख कुस्त्यांच्या अगोदर तब्बल सतरा ते अठरा कुस्त्या झाल्या. यामध्ये जवळपास सर्वच प्रमुख कुस्तीबरोबर इतर कुस्त्या चितपट झाल्या. अतिशय थरारक झालेल्या या कुस्ती स्पर्धेत कुस्ती शौकीनांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. प्रत्येक कुस्तीला प्रेक्षक दाद देत होते. बर्याच वर्षांनंतर पुणे अहिल्यानगर, मुंबई तसेच राज्यातील इतर भागातील आलेल्या कुस्ती शौकिनांना रोमहर्षक कुस्त्या पाहावयास मिळाल्या.

या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दैनिक नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजीराव शिर्के, राष्ट्रीय कुस्ती पंच भालेराव, प्रसिद्ध निवेदक युवराज केचे, कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मच्छिंद्रशेठ लंके, उद्योगपती सुभाष झिने, आयोजक पैलवान अमोल लंके, सुरेश पठारे, अभय औटी, नितीन अडसूळ, विकास आढाव, बाबासाहेब चिडे, अरुण मुन्सी, सुनिती ज्वेलर्सचे मालक गणेश कटारिया, विकास सावंत, डी बी लाळगे कन्स्ट्रकशन कंपनीचे संचालक सागर लाळगेसह इतर मान्यवर तसेच कुस्तीशौकीन, पारनेर, शिरुर तालुयातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
सभापती शिंदे म्हणाले, ग्रामीण भागात शेतीचा विकास करताना कन्हैया दूध उद्योग समूहाचे संस्थापक शांताराम मामा लंके यांनी मोठ्या प्रमाणात उद्योग विश्व निर्माण केले. कन्हैयाचा नावलौकिक जगात झाला आहे. युवा उद्योजक म्हणून काम करताना कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मच्छिंद्रशेठ लंके यांनी दूध उत्पादक शेतकर्यांना दूधाला भाव मिळवून देत दूधापासून विविध पदार्थ तयार केले. त्याचा नावलौकिक जगात झाला आहे. निघोजसारख्या ग्रामीण भागात उद्योगविश्व निर्माण करण्याची जबाबदारी मच्छिंद्रशेठ लंके यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. कन्हैया माध्यमातून शांताराम मामा लंके यांच्या स्मरणार्थ या कुस्ती स्पर्धा घेऊन कुस्ती स्पर्धेला राजाश्रय देण्याचे काम मच्छिंद्रशेठ लंके यांनी केले असल्याचे गौरवोद्गार सभापती शिंदे यांनी काढले.
दैनिक नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजीराव शिर्के म्हणाले की, शांताराम मामा लंके यांचे गाव विकासासाठी सर्वाधिक योगदान आहे. सामाजिक, धार्मिक कृषी, शैक्षणिक तसेच उद्योग व्यवसायासाठी मामांचे योगदान सर्वाधिक आहे. गाव विकासासाठी काम करताना त्यांनी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या माध्यमातून अनेक योजना राबवून समाजहिताचे काम केले आहे. कन्हैया दूध उद्योग समूह उभा करताना याचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे, हा उद्देश ठेऊन त्यांनी काम केले. त्यांचेच अनुकरण करताना कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मच्छिंद्र लंके यांनी हा उद्योग समूह मोठा करीत याचा कारभार सातासमुद्रापार नेला आहे. शांताराम मामा लंके यांच्या स्मरणार्थ कुस्ती स्पर्धा घेऊन कन्हैया दूध उद्योग समूह व त्यांच्या सर्व सहकार्यांनी एक कुस्ती परंपरेला आधार देत पैलवानांना राज्यस्तरावर व्यासपीठ मिळवून दिले असून हेच अनुकरणीय काम सर्वत्र होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिर्के यांनी व्यक्त केेले.
कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मच्छिंद्रशेठ लंके यांनी सांगितले की, कन्हैया दूध उद्योग समूहाची स्थापना सर्वसामान्य जनतेच्या हितार्थ झाली असून तोच उद्देश ठेऊन आम्ही व आमचे सहकारी कार्यरत आहोत. कुस्ती स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून ग्रामीण भागातील पैलवानांना कुस्ती स्पर्धेसाठी व्यासपीठ मिळाले पाहिजे, ही भूमिका कन्हैया दूध उद्योग समूहाचे संस्थापक शांताराम दादा लंके यांची होती म्हणून त्यांच्या स्मरणार्थ कुस्ती स्पर्धा घेऊन पैलवानांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. या कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेले पैलवान, प्रायोजक, मान्यवर व कुस्ती शौकीन यांचे लंके यांनी आभार मानत धन्यवाद व्यक्त केले.










