- जाहिरात -spot_img
breaking news

सात कोटी थकबाकी ठेकेदारांकडे; वसुलीच्या नोटिसा मात्र कामगारांना, कामगारांनी काय केले पहा…

अहिल्यानगर रेल्वे मालधक्का कामगारांची सहायक कामागार आयुक्तांकडे तक्रार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर रेल्वे मालधक्का येथील नोंदणीकृत माथाडी कामगारांनी सहायक कामगार आयुक्त, अहिल्यानगर तथा अध्यक्ष माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ठेकेदार हुंडेकऱ्यांकडून सुमारे सात कोटी रुपयांची थकबाकी असताना ती वसूल करण्याऐवजी उलट गोरगरीब कामगारांकडूनच तब्बल आठ कोटी रुपयांची वसुलीची कारवाई सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे मंडळ हे कामगारांच्या हितासाठी आहे की थकबाकीदार असणाऱ्या बड्या ठेकेदारांना संरक्षण देण्यासाठी, असा संतप्त सवाल शिवसेना कामगार आघाडीचे जिल्हाप्रमुख विलास उबाळे यांनी उपस्थित केला आहे.

ठेकेदारांकडे कोट्यवधींची थकबाकी असताना आठ कोटींच्या वसुलीच्या नोटिसा मात्र माथाडी कामगारांना धाडण्यात आल्यामुळे सहायक कामगार आयुक्तांचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्याविरोधात कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत सहायक कामगार आयुक्तांना निवेदन देत कामगारांचे आर्थिक शोषण थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, जयराम आखाडे, गौतम सैंदाणेे, देवराम शिंदे, बाबासाहेब वैरागर, विनोद शिरसाठ, मल्हारी साप्ते, दीपक काकडे, राजेंद्र तरटे आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याबाबत बोलताना विलास उबाळे म्हणाले, ठेकेदार हुंडेकऱ्यांकडे मागील सुमारे तीन वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. त्याचा पहिला हप्ता मिळविण्यासाठी आम्हाला आमच्या संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन, मुंडण आंदोलन, मुंबईत आझाद मैदानावर सहा दिवस उपोषण, त्यानंतर बायको, लेकराबाळांसह अहिल्यानगर शहराच्या बाजारपेठेतून आक्रोश मोर्चा काढावा लागला होता. तेव्हा कामगारांच्या पदरात पहिला हप्ता पडला. मात्र त्यानंतर दोन वर्ष उलटले तरी देखील जाणीवपूर्वक ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम मंडळाकडून सुरू आहे. आम्ही मागणी करतो म्हणून आमचा आवाज दाबण्यासाठी आमच्यावरच चुकीच्या पद्धतीने तब्बल आठ कोटी रुपयांची वसुलीची कारवाई सुरू करून कामगारांना भीती दाखवली जात आहे.

निवेदनात म्हटले आहे, ऑगस्ट 2025 पासून हजेरी पत्रकानुसार पूर्ण वेतन देखील मिळत नसून दर महिन्याला वेतनात कपात करून कामगारांचे आर्थिक शोषण केले जात आहे. कामगारांनी अन्यायकारक वसुली मागे घेणे, थकबाकीदार ठेकेदार हुंडेकऱ्यांच्या मालमत्तांवर जप्ती आणून वसुली करणे, प्रत्येक कामगाराच्या वेतनाची स्वतंत्र लेखा परीक्षणाद्वारे तपासणी करणे, वेतन कपातीचा लेखी खुलासा देणे आणि कपात केलेली रक्कम व्याजासह परत देणे अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा :  इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चोऱ्या; पोलिसांनी टोळीला ठोकल्या बेड्या...

अन्यथा आमरण उपोषण..
गोरगरीब कामगारांनी हे कोट्यवधी रुपये आणायचे कुठून असा सवाल करत, यासंदर्भात सात दिवसांच्या आत लेखी खुलासा व थकबाकीदार ठेकेदारांच्या विरोधात ठोस कारवाई न झाल्यास सर्व कामगार सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयामध्ये सामूहिक फाशी देण्याची मागणी मंडळाकडे सर्व कामगार करणार असल्याचा इशारा विलास उबाळे यांनी दिला आहे. वेळ प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगार आमरण उपोषण सुरू करतील, असेही उबाळे यांनी म्हटले आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ