अहिल्यानगर | नगर सह्याद्री
आपल्या भारत देशामधील वृध्दाश्रम आणि अनाथालय पूर्णपणे बंद झाल्यावरच भारत विश्व गुरू होईल, असे प्रतिपादन वृंदावन निवासी परम श्रध्देय पूज्य श्री इंद्रेशजी उपाध्याय यांनी केले.
येथील श्रीमती कौशल्यादेवी गौरीशंकरजी गुप्ता, महेश गुप्ता आणि आयुष गुप्ता यांनी सावेडी मधील मिस्कीन मळ्यात आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे व्दितीय पुष्प गुंफताना ते बोलत होते.सर्वश्री सुधीर झालानी, किसनलाल बंग, प्रदिप पंजाबी यांच्यासह शहरातील मान्यवर प्रतिष्ठित भाविक येथील अलोट गर्दीवर नियंत्रण ठेवत उपस्थित सर्वांना कथा सोहळ्याचा आनंद मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेताना दिसत आहेत.
पूज्य श्री इंद्रेशजी उपाध्याय पुढे म्हणाले, आई-वडिलांची सेवा करताना प्रत्यक्ष पांडुरंग आले तरी सेवेत खंड पडू न देता भक्त पुंडलिकाने पांडुरंगाला थांबायला सांगितले. आई-वडिलांच्या सेवेने भगवंत प्रसन्न होतो, हे पुंडलिकाने दाखवून दिले तरीही करिअरच्या नावाखाली आई-वडिलांना वृध्दाश्रमात ठेवणारी मुलं आहेतच! बाळ जन्माला आल्यावर त्याला अनाथालयात पोहोचवणारे माता-पिता आहेतच! ही वस्तुस्थिती मनाला प्रचंड वेदना देणारी आहे.आपली वाणी, बुद्धी अपवित्र होऊ शकते. मात्र आत्मा सदैव पवित्र असतो.
भगवंताच्या कथा ऐकताना मन तल्लीन होऊ लागले तर समजावे भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होणार आहेत. श्रीकृष्णांचा प्रभाव सगळ्यांना जाणवतो. भक्तांचा भाव पाहून भगवंत प्रसन्न होतात. आपले शारीरिक, बौद्धिक, मानसिक, पारिवारिक ताप कथा श्रवणाने निघून जातात. शरिरातील रोम-रोम पुलकित होतो. आपल्या शरीरात रक्त नव्हे तर कृष्ण नावाची धारा वाहते, असे वाटते. श्रीकृष्णांचे नामामृत पिल्यावर साक्षात श्रीकृष्णाची भेट होतेच, असा विश्वास पूज्य श्री इंद्रेशजी उपाध्याय यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, भगवान श्रीकृष्णाची प्रेमयुक्त, श्रध्दायुक्त भक्ती करा. निस्वार्थ भावनेने केलेली भक्ती भगवंतापर्यंत पोहोचवते. आपले मन, चित्त, वृत्ती, कान, डोळे असे सर्वच शरीर एकाग्र होऊ लागले की, आपण भगवंताजवळ पोहोचू लागलो आहोत, हे लक्षात घ्या. ज्यांना मुगल बादशहा थरथर कापत होते त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून सत्संगात अश्रू ओघळत. गोकुळातील गोपी संसार विसरत. पंढरपूरात संत नामदेवांच्या संकीर्तनात प्रत्यक्ष विठ्ठल नाचत. माया म्हणजे संसार आणि परमात्मा म्हणजे भक्ती हे दोन्हीही वेगवेगळे आहे हे लक्षात घेऊन डोळे मिटले की, डोळ्यांसमोर पंढरीनाथ उभे रहातात, असे पूज्य श्री इंद्रेशजी उपाध्याय यांनी सांगितले. भज रे् हरी का नाम या सुमधुर भक्तीगाताने सर्वांना हरिनामात तल्लीन होण्याचा आनंद मिळवून दिला.










