पुणे / नगर सह्याद्री :
मुंबई वेधशाळा हवामान अंदाजानुसार पुणे जिल्ह्यात दिनांक ०६/०७/२०२६ रोजी रेड अलर्ट दिला असून त्याप्रमाणे देहू व आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे सदर परिसरातील पाणी साठा वाढला आहे.
श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी प्रस्थान अनुक्रमे दिनांक ०७ व ०८ जुलै रोजी देहू व आळंदी येथून होणार आहे. तरी सुरक्षतेच्या दृष्टीने पालखी सोहळ्यात पुणे महानगपालिकेच्या हद्दी अथवा त्यापुढे पासून सहभागी व्हावे असे जिल्हा प्रशासनाकडून सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना सूचना देण्यात येत आहे. याबात सर्वांनी सयंम बाळगून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी पुणे यांचे वतीने करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले….
मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या निर्माण झालेली पूर परिस्थिती अत्यंत गंभीर असून प्रशासनाकडून त्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. अतिवृष्टीमुळे इंद्रायणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले असून देहू आणि आळंदी परिसरात वाहतुकीसह हालचालींवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी वारकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
वारी १० जुलै रोजी पुण्यात दाखल होणार असून देहू आणि आळंदी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याऐवजी वारकऱ्यांनी थेट पुण्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. सध्याच्या परिस्थितीत देहू किंवा आळंदी येथे जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वारकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. वारीसाठी राज्य शासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन वारकऱ्यांच्या निवारा, भोजन, वैद्यकीय सेवा आणि इतर आवश्यक सोयींचे नियोजन करण्यात आले असल्याचेही फडणवीस म्हणाले.
खडकवासला धरण साखळीत पाणी वाढले; नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभर पावसाने हजेरी लावली. यामुळे पाणीसाठ्यात वाढ सुरूच असून मागील तीन दिवसांत धरणात महिनाभराचा पाणीसाठा वाढला आहे.
शहरातील पालखी सोहळ्यासाठी महापालिकेने दोन दिवस पाणीकपात रद्द केलेली आहे. वाढलेल्या पाणीसाठ्याने महापालिकेस दिलासा मिळाला आहे. तसेच नागरिकांना देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून खडकवासला धरण जलाशय आज दिनांक 06 जुलै 2026 रोजी दुपारी 2:00 वाजता 32% टक्के क्षमतेने भरले आहे.
धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व धरणात येणारा येवा पाहता येत्या 24 तासांत धरण 80% अथवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. पार्जन्यमानाच्या परिस्थितीनुसार कधी ही धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांना सूचना देण्यात याव्या आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे ही विनंती. असं सांगण्यात आलं आहे.

मुंबई–पुणे मिसिंग लिंकवर मलबा हटविण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात झालेल्या मोठ्या दरडीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवश्यक नसल्यास मुंबई–पुणे मार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, दरड कोसळलेल्या ठिकाणी सुमारे १०० टन मलबा साचला होता. विशेष म्हणजे, यापूर्वी अशा प्रकारची दरड न कोसळलेल्या भागात ही घटना घडली आहे. आतापर्यंत सुमारे ७० टन मलबा हटविण्यात यश आले असून उर्वरित मलबा हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे.
सध्या पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील तीन लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. तर मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर एकाच लेनमधून वाहतूक सुरू असून, पुढील दीड तासात आणखी मार्ग पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली.
या कामाचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले घटनास्थळी उपस्थित असून, संबंधित विभाग, यंत्रणा आणि आपत्कालीन पथके समन्वयाने काम करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे, वाहतूक पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसारच प्रवास करण्याचे आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.










