मुंबई : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत ‘सालबर्डी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यात ती एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढली आहे.
पी. आय. मनोरमा प्रधान असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. नुकताच ‘सालबर्डी’ या चित्रपटाचा दमदार टीझर आणि कलाकारांचे प्रभावी पोस्टर दिमाखात प्रदर्शित करण्यात आला आहे. यात पूजाने डॅशिंग एंट्री घेत आपल्या भूमिकेची झलक दाखवली. या भूमिकेबद्दल बोलताना पूजा सांगते, “वर्दी अंगावर चढताच एक वेगळाच रुबाब आपोआप येतो. तो वेगळा दाखवावा लागत नाही. वर्दीतच एक ताकद असते. माझी ही भूमिका प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारी ठरेल.”

महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे.

तर अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशिष पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, चित्रपटातील थरारक स्टंट्स आणि दमदार अॅक्शन सीन्स हे ‘सालबर्डी’ चे खास आकर्षण असणार आहेत. येत्या 17 एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.










