फरार आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी
राहुरी | नगर सह्याद्री
योगेश चोपडे ऊर्फ डॉन यांच्यावर दोन हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेत योगेश चोपडे ऊर्फ डॉन हे गंभीर जखमी झाले. या घटनेला आठ दिवस उलटून गेले असून, अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. या घटनेच्या निषेधार्थ राहुरी पोलिस ठाण्यासमोर यशवंत सेनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
दि. 14 जून रोजी दुपारी योगेश रावसाहेब चोपडे ऊर्फ डॉन हे राहुरीकडून राहुरी खुर्दकडे मोटरसायकलवर जात असताना पाठीमागून आलेल्या अक्षय गोपाळे व एक अज्ञात तरुणाने योगेश चोपडे यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत योगेश ऊर्फ डॉन हे गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर राहुरी पोलीस ठाण्यात अक्षय बाबासाहेब गोपाळे (रा. बारागाव नांदुर) व एक अज्ञात तरुण अशा दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटनेबाबत दि. 22 जून रोजी राहुरी येथील यशवंत सेनेच्या वतीने पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मेजर अमोल मंचरे यांना मारहाण करणारे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ व इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबीत करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख म्हणाले की, आरोपी अक्षय गोपाळे याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देशमुख यांनी दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी यशवंत सेनेचे विजय तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, प्रदिप पवार, सुभाष मोरे, रामदास बाचकर, भारत मतकर, बाबासाहेब केसकर, दादाभाऊ तमनर, नरेंद्र शेटे, गोरख चोपडे, श्रीकांत बाचकर, राहुल पाटोळे, विठ्ठल तमनर, साईनाथ भिसे, सुनील तमनर, प्रशांत चोपडे, सोपान बाचकर आदि उपस्थित होते.










