किरण काळे; फुटीर खासदारांच्या गाढवावरील प्रतिमांना जोडे मारत पायदळी तुडवले
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शिवसेना या चार अक्षरांमुळे खासदारांना जनतेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहत निवडून दिले. तुम्ही मात्र फितूर झालात. गद्दार निघालात. पन्नास खोके, सत्ता यापुढे तुम्ही जनता, शिवसेनेशी बेईमान झालात. हिम्मत असेल तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह सहाही खासदारांनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. मग खुशाल ज्या पक्षात जाऊन शेण खायचा आहे ते खावं, अशी संतप्त भावना ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी व्यक्त केली. हे ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन गद्दार’ आहे. फुटीर खासदार हे टायगर नाहीत. लबाड लांडगे आहेत, असा हल्लाबोल यावेळी काळे यांनी केला.
ठाकरे शिवसेनेच्या खासदारांनी केलेल्या बंडानंतर अहिल्यानगरमध्ये कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला. ठाकरे शिवसेनेसह, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने फुटीर खासदारांच्या गाढवावरील प्रतिमांना जोडे मारत पायदळी तुडविण्यात आले. बाजारपेठेत झालेली तीव्र निदर्शने, जोरदार घोषणाबाजी मुळे परिसर दणाणून गेला होता. यावेळी फुटीर खासदारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संजय झिंजे, रावजी नांगरे, दीपक भोसले, मनोज गुंदेचा, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, प्रतीक बारसे, सुशांत म्हस्के, राम वाणी, राम झिने, चंद्रकांत उजागरे, धनंजय देशमुख आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
फुटीर खासदारांवर राईट टू रिकॉल लागू करा
पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आणि पक्ष, जनतेशी बेइमानी करून फुटीर भूमिका घेणारे खासदार जनादेशाचा अपमान करीत आहेत. अशा लोकप्रतिनिधींना जनतेसमोर पुन्हा उत्तरदायी करण्यासाठी राईट टू रिकॉल कायदा देशात तातडीने लागू करण्याची गरज आहे. मतदारांचा विश्वासघात करणार्यांना पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच जनतेला परत बोलावण्याचा अधिकार मिळायला हवा, अशी भूमिका यावेळी किरण काळे यांनी मांडली.










