सोलापूर / नगर सह्याद्री –
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १२ जून रोजी काढलेल्या आदेशात, ‘रुग्णांना रुग्णालयातील औषध विक्री दुकानातून औषध खरेदी करण्याची सक्ती नाही’, असे स्पष्ट नमूद केलेलं असतानाही राज्यात असे प्रकार अजूनही सुरू असल्याचं समोर आलं आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमात ‘सल्या’ची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख याला सोलापुरातील एका रुग्णालयात याबाबतचा भयंकर अनुभव आला. “माझ्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याने सोलापुरातील नोबल रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी गोळ्यांसाठी प्रिस्क्रिप्शन दिले. या गोळ्या मी बाहेरच्या मेडिकलमधून आणतो, असं सांगितल्यानंतरही त्यांनी मला रुग्णालयातीलच मेडिकलमधून गोळ्या घेण्यास भाग पाडलं. ज्या गोळ्या मी बाहेरच्या मेडिकलमधून २० हजारांमध्ये आणू शकत होतो, तिथे त्यांनी माझ्याकडून ४० हजार रुपये घेतले,” असा आरोप अरबाज शेख याने सकाळी केला होता. अरबाजच्या या व्हिडिओची सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्यानंतर आता तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासनाने तत्परता दाखवत नोबल रुग्णालयाशी संलग्न असलेल्या फातिमा मेडिकलची तपासणी करत औषध विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अभिनेता अरबाज शेख याच्या आरोपानंतर नोबेल रुग्णालयातील फातिमा मेडिकल सील करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी मेडिकलची तपासणी केली. तपासणीनंतर अरुण गोडसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “रुग्णालयातील पहिल्या मजल्यावर ओपीडी आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टरां दिलेली औषधांची चिठ्ठी फातिमा मेडिकलमधील संगणकावर प्रसिद्ध होते. त्यामुळे प्राथमिक माहितीनुसार रुग्णांना याच मेडिकलमधून औषध घेण्यास सांगितले जात असल्याचे पुरावे आढळले आहेत,” असं गोडसे यांनी स्पष्ट केलं आहे.
औषध खरेदीवरुन FDA चा इशारा काय?
रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषध खरेदी करणं कायद्यानं बंधनकारक नाही. औषधं कुठून खरेदी करायची, हा सर्वस्वी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचा अधिकार आहे”, असा महत्त्वपूर्ण आदेश एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेला. तसेच, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिलेला. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या आदेशाबाबत माहिती देताना सांगितलेलं की, “बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे अशा तक्रारी येतात आणि माहिती मिळते की, हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट ॲडमिट असेल, तर त्याला लागणारी औषधं त्याच हॉस्पिटलच्या फार्मसीमधून घेण्याची सक्ती केली जाते. पण, कायद्यानुसार कोणतीही संस्था किंवा रुग्णालय रुग्णांना अशी सक्ती करू शकत नाही. बाहेरून औषधं आणणं हा रुग्णाचा वैयक्तिक चॉईस आहे. तुम्ही कोणावरही सक्ती करू शकत नाही. औषधं कुठून खरेदी करायची, हा नागरिक आणि पेशंटचा मूलभूत अधिकार आहे…”
अरबाजच्या आरोपांवर रुग्णालयाचं म्हणणं काय?
‘सैराट’ फेम सल्या म्हणजे, अरबाज शेख यानं सोलापुरातील ज्या नोबल हॉस्पिटलवर आरोप केलेत, त्याची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न देखील आपण केला. नोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमजदअली सय्यद यांनी अरबाज यानं केलेले आरोप खोटे असल्याचा दावा केलाय. “अरबाज शेख याचे वडील अत्यंत सिरीयस स्थितीत हॉस्पिटलला आले होते. ते केवळ काही तास हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यांना गरज असलेलीच औषध देण्यात आली होती. त्यासाठी आमच्याच मेडिकलमधून औषधं घ्यायला कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र, अरबाज यानं हे आरोप का केलेत? याची कल्पना आम्हाला नाही…”, असा दावा त्यांनी एबीपी माझाशी फोनवरून बोलताना केलाय. मात्र, या संदर्भात स्वतः कॅमेरासमोर प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत.
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अरबाज शेख काय म्हणालाय?
अरबाज शेख व्हिडीओमध्ये म्हणालाय की, “नमस्कार मी अरबाज शेख, मी आता सोलापुरातील नोबल हॉस्पिटलसमोर उभा आहे. आठ दिवस झाले, पप्पांना ब्रेन हॅमरेज झालंय म्हणून सोलापूरला अॅडमिट केलंय. त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला नोबल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं. नोबल हॉस्पिटलचा अनुभव मला इतका घाण आला की, जेव्हा आम्ही पेशंटला तिथे अॅडमिट केलं, तेव्हा सर्वात 10 हजार रुपये डिपॉझिट भरायला सांगितलं, आम्ही ते भरले… त्यानंतर त्यांनी मला गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की, या गोळ्या आपल्याला लागतील. मग मी त्यांना विचारलं की, मी हे बाहेरुन आणू शकतो? तर त्यांनी सांगितलं की, नाही तुम्हाला आमच्या मेडिकलमधूनच त्या गोळ्या, इंजेक्शन्स घ्यावा लागतील. मी त्यांच्या मेडिकलमधून औषधं घेतली, तर ती सर्व औषधं 40 हजारांहून जास्त किमतीची होती. त्यांच्याच मेडिकलमधून औषधं घ्यावीत, हा फोर्स होता. यापूर्वी जेव्हा पप्पांना अॅडमिट केलं, तेव्हा तिथे मला असा काहीच अनुभव आला नाही. त्या गोळ्या मी बाहेरुन आणल्या की, जवळपास अर्ध्या किमतीत मला त्या पडत होत्या. पण इथे एवढी लूट होतीय, माझ्या बापाला मला मरताना नाही पाहायचंय, म्हणून मला त्यांना नोबलमधून शिफ्ट करावं लागलं. मला खूपच इथे वाईट अनुभव आलाय, त्यामुळे ज्यांना माहीत आहे त्यांनी मला सांगावं की, मी कुठे ट्रिटमेंट केली पाहिजे? कशी ट्रिटमेंट केली पाहिजे मला आता काहीच कळत नाहीये, माझ्या वडिलांना मला वाचवायचंय काही करुन, मला मदत करा प्लीज…”
दरम्यान, सैराट फेम अभिनेता अरबाज शेख यानं सोलापुरातील हॉस्पिटल संदर्भात जे आरोप करत व्हिडीओ शेअर केला होता, तो व्हिडीओ त्यानं त्याच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून हटवला आहे. अरबाज शेख याच्याशी एबीपी माझा सकाळपासून संपर्क करण्याचा प्रयत्न करतंय मात्र त्याच्याशी संपर्क होऊ शकतं नाहीये. त्यामुळे आधी आरोप केल्यानंतर अरबाजनं आता व्हिडीओ का डिलीट केलाय? यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.










