वासुंदे येथे विद्युत उपकेंद्र मंजूर करा -सुजित झावरे पाटील यांची उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी |
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्याचा भौगोलिक विस्तार अत्यंत मोठा असल्याने तालुयाच्या शेवटच्या टोकाला असणार्या गावांना सध्या अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वासुंदे येथे नवीन विद्युत उपकेंद्र मंजूर करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या संदर्भातील शिफारस मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्र्यांकडे करण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात झावरे पाटील यांनी पारनेरमधील वीज समस्येकडे लक्ष वेधले आहे. तालुयाच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील शेतकरी आणि नागरिकांना अपुर्या आणि कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. पिकांना पाणी देणे असो वा घरगुती वापर, कमी दाबाच्या विजेमुळे उपकरणांचे नुकसान होते आणि शेतीचेही मोठे नुकसान होत आहे.
वासुंदे या ठिकाणी नवीन विद्युत उपकेंद्र उभारल्यास परिसरातील ११ गावांमधील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. विशेष म्हणजे, या उपकेंद्रासाठी वासुंदे येथे आवश्यक असलेली जागाही उपलब्ध आहे. तसेच यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव आधीच ऊर्जा विभागाकडे सादर करण्यात आला आहे.हा प्रश्न तातडीने सुटावा, यासाठी उपमुख्यमंत्री स्तरावरून मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्र्यांकडे विशेष शिफारस व्हावी, अशी आग्रही मागणी झावरे पाटील यांनी केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले असून, यामुळे पारनेरच्या ग्रामीण भागाला मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
कमी दाबाने वीज पुरवठ्याचा फटका
पारनेर तालुयाच्या शेवटच्या टोकावरील गावांना सध्या तीव्र वीज टंचाई आणि कमी दाबाने वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. वासुंदे येथे विद्युत उपकेंद्र झाल्यास परिसरातील ११ गावांचा विजेचा प्रश्न कायमचा सुटेल, यासाठी जागा उपलब्ध असून, प्रस्तावही दिलेला आहे. हा लोकहिताचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीची मागणी केली आहे.
– सुजित झावरे पाटील, माजी उपाध्यक्ष










