सात दिवसांत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन
अहिल्यानगर/ नगर सह्याद्री :
श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी–कोरेगव्हाण–सारोळा सोमवंशी या रस्त्याचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे, तसेच निकृष्ट व अपूर्ण कामाची चौकशी करून रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावा, या मागणीसाठी अहिल्यानगर येथील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश आले आहे. संबंधित विभागाने रस्त्याचे काम येत्या सात दिवसांत सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर खासदार नीलेश लंके यांच्याहस्ते या उपोषणाची सांगता करण्यात आली आहे.
या रस्त्याच्या प्रश्नावर निंबवी, कोरेगव्हाण व सारोळा सोमवंशी परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात एकजूट दाखवत शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले होते. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि संघर्षामुळे प्रशासनाला या प्रश्नाची अखेर दि. 9 रोजी दखल घ्यावी लागली.या आंदोलनात निंबवीचे मेजर आनंदराव गावडे यांनी कोरेगव्हाणचे युवा नेतृत्व प्रदीप बारगुजे यांना सुरुवातीपासूनच खंबीर साथ देत उपोषणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर युवक, ज्येष्ठ नागरिक, व विविध स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या आंदोलनाला अधिक बळ दिले.
यावेळी या रस्ता संघर्ष समितीचे प्रदीप बारगुजे यांनी सांगितले की, हा विजय कोणत्याही एका व्यक्तीचा नसून संपूर्ण निंबवी–कोरेगव्हाण–सारोळा सोमवंशी ग्रामस्थांच्या एकीचा आणि न्याय्य हक्कासाठी दिलेल्या लढ्याचा विजय आहे. रस्त्याचे काम निर्धारित निकषांनुसार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होईपर्यंत संघर्ष समितीचा हा पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खासदार निलेश लंके यांनी उपोषणास उपस्थित राहत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या गावकऱ्यांना सहकार्य करून हा रस्ता उत्कृष्ट व चांगल्या दर्जाचा बनवून द्या असे सुचविले. सदर रस्त्याचे सात दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याच्या लेखी आश्वासनामुळे उपोषणार्थी व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्याच्या या कामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपोषणाची सांगता करताना खासदार नीलेश लंके यांचेसह कार्यकारी अभियंता संजय राठोड, रस्ता संघर्ष समितीचे प्रदीप बारगुजे, मेजर आनंदराव गावडे व आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मा.जि.प.सदस्य अनिल ठवाळ, श्रीगोंदा व अहिल्यानगरच्या निर्भय महाराष्ट्र पार्टी च्या शीतल गोरे तसेच स्वप्नील लोखंडे, कोरेगव्हाणचे मा. उपसरपंच आप्पा आढाव, सचिन गोंटे, केशव चोभे, मेजर साहेबराव कातोरे, अरुण आढाव, सचिन बारगुजे, सदाशिव गोंटे, नाना आढाव, महादेव गोंटे, दगडू कातोरे, बाबुराव उदार व शिवाजी बारगुजे यांचेसह निंबवी, कोरेगव्हाण व सारोळा सोमवंशी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










