अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
येथील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गोविंद बलराज बेहेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेहेल हे उपचारासाठी नाशिक येथे गेले होते, त्यामुळे त्यांचे घर काही काळ बंद होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. घरामध्ये ठेवलेली ८० हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, कर्णफुले, चांदीचे विविध दागिने व इतर मौल्यवान वस्तू असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
घराची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला दरवाजाचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आल्यावर ही चोरी उघडकीस आली. माहिती मिळताच बेहेल यांनी नातेवाईकांना बोलावून पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी केली आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हात उसने पैसे परत मागितले, तरुणाला बेदम मारहाण
अहिल्यानगरातील एमआयडीसी भागात खळबळ
अहिल्यानगर : दिलेले हात उसने पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय विकास सोनवणे हा तरुण आपल्या मित्राकडे दिलेले हात उसने पैसे परत मागण्यासाठी गेला होता. मात्र, पैसे परत मागत असल्याचा राग मनात धरून आरोपींनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला.
या प्रकरणी नंदु पावलस सोनवणे, विवेक नंदु सोनवणे, कविता नंदु सोनवणे आणि छाया सतिष सोनवणे या चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी विजय सोनवणे याला प्लास्टिकच्या पाईपने आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत, ‘पुन्हा जर पैसे मागायला आलास, तर तुला जिवे मारून टाकू,’ अशी धमकी आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी भा.न्या.सं. च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. भरवस्तीत झालेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
रसवंती चालविण्यावरून राडा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर – येथील बोल्हेगाव फाटा परिसरात रसवंती गृह चालविण्यावरून झालेल्या वादातून एका व्यावसायिकास मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनल सुरेश गोरे यांचे बोल्हेगाव फाटा परिसरात रसवंती गृह आहे. ३ मार्च रोजी सायंकाळी आरोपी कुमार काशीनाथ शिंदे, राजेंद्र काशीनाथ शिंदे आणि संदेश मोहिते हे चारचाकी गाडीतून आले. त्यांनी ‘येथे उद्यापासून दुकान चालवायचे नाही’ अशी धमकी देत दुकानातील साहित्याची तोडफोड केली. त्यानंतर पुन्हा येऊन आरोपींनी फिर्यादी सोनल गोरे आणि त्यांचे भाऊ प्रवीण गोरे यांना वस्तारा व उसाने मारहाण केली. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली.
सोनल गोरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहेत. शहरात घडलेल्या या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.










