जाब विचारणाऱ्या कुटुंबीयांनाही शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी
पारनेर | नगर सह्याद्री
शहरातील न्यू इंग्लिश स्कूल परिसरात शाळेतून घरी जाणाऱ्या एका 15 वषय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढ्यावरच न थांबता, या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनाही आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित विद्यार्थिनी पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत असून ती मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे एसटी बसने शाळेत आली होती. दुपारी शाळा सुटल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास ती गावाकडे जाण्यासाठी पारनेर एसटी स्थानकाच्या दिशेने पायी निघाली होती. न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वारासमोर ती आली असता, गौरव भाऊसाहेब साळुंखे (रा. मटन मार्केट, पारनेर) व विकास विलास सोनवणे (रा. रांधे, ता. पारनेर) यांनी तिचा पाठलाग सुरू केला. तुझा मोबाईल नंबर मला दे, तू मला आवडते आहेस, असे म्हणत त्यांनी तिची छेड काढली व तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने कसाबसा तेथून निघून घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलीकडून घटना समजल्यानंतर तिचे वडील व इतर नातेवाईक आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले. मात्र, चूक मान्य करण्याऐवजी आरोपींनी त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच तुम्हाला जीवे मारून टाकू, अशी धमकी देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.याप्रकरणी पारनेर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 78, 351(2), 352, 3(5) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम, 2012 मधील कलम 8, 12 व 18 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दामिनी पथक गायब
शाळा सुटल्यानंतर भरदिवसा शैक्षणिक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शाळा, महाविद्यालये, एसटी स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात रोडरोमिओंवर प्रभावी कारवाई करण्याची तसेच पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंना जरब बसविण्यासाठी दामिनी पथकाची नियुक्ती केली असताना दामिनी पथक सक्रिय नसल्याने अशा घटना घडत आहे.
विद्यार्थिनीच्या विनयभंग; पोलिसांच्या गाडीसमोर ग्रामस्थांचा ठिय्या; घटनेच्या निषेधार्थ दोन गावांत कडकडीत बंद, आरोपी अटक
राहुरी | नगर सह्याद्री
तालुक्यातील तुळापूर येथे एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीचा रस्त्यात अडवून विनयभंग करण्यची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. राहुरी तालुक्यातील तुळापूर आणि निंभोरे हे दोन गावांनी आज गुरुवारी कडकडीत बंद पाडून या घटनेचा निषेध केला.
अल्पवयीन विद्यार्थिनी रस्ताने जात असताना आरोपी आरमान जब्बार शेख यांनी तिला रस्त्यात अडवले आणि तिचा विनयभंग केला. या अचानक घडलेल्या घटनेने विद्यार्थिनी प्रचंड घाबरली. घटनेचे गांभीर्य ओळखून पालकांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.ही घटना परिसरात समजतात ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या मांडला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते अखेर पोलिसांनी जमावाला शांत करत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले. पालकाच्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी आरमान जब्बार शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
शाळकरी मुलीवर अत्याचार
अहिल्यानगर : तालुक्यातील पिंपळगाव माळवी अंतर्गत येणाऱ्या आढाववाडी (शिंदे वस्ती) येथे एका 15 वषय अल्पवयीन शाळकरी मुलीवर वेळोवेळी अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी वसंत गहिनीनाथ चौधर याला ताब्यात घेतले आहे. मे 2026 पासून आरोपी वसंत चौधर याने पीडित मुलीला आपल्या राहत्या घरी बोलावून घेतले. तिने नकार दिला असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तिचे तोंड दाबून तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी अत्याचार केला. काही दिवसांनंतर पीडित मुलीचे पोट दुखू लागल्याने नातेवाईकांनी तिला उपचारासाठी एमआयडीसी येथील एका रुग्णालयात दाखल केले. तेथील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे समोर आले. यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पीडितेच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोंढे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
विवाहितेचा छळ
अहिल्यानगर: घरगुती कामे येत नसल्याचा बहाणा करून आणि गावाकडील नवीन घर बांधण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगरमधील नगर तालुका पोलीस ठाण्यात सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला उपाशी ठेवून, शिवीगाळ व मारहाण करत घरातून हाकलून देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विवाह झाल्यापासून ते मार्च 2026 पर्यंत सासरच्या मंडळींकडून हा छळ सुरू होता. सासरच्या लोकांनी विवाहितेवर विविध कारणांवरून संशय घेऊन तिला वेळोवेळी त्रास दिला. माहेरहून मोठ्या रकमेची मागणी पूर्ण न केल्यामुळे तिला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले. आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी देऊन घरातून बाहेर काढले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर येथील भरोसा सेलकडे प्राप्त झालेल्या तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










