संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळा शनिवारी मार्केटयार्डमध्ये
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून वारकरी पायी दिंडीने पंढरपूरकडे रवाना होत आहेत. पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी दरवष वारी करीत असतात. अहिल्यानगर शहरातून दरवषप्रमाणे यंदाही त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा व दिंडी पंढरपूरकडे मार्गक्रमण करणार आहे. हा पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी 5 वाजता अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड येथे मुक्कामी असणार आहे. या दिंडीतील वारकऱ्यांचे सालाबाद प्रमाणे भव्य स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती मार्केट यार्ड मित्र मंडळाचे अध्यक्ष अमोल पोखरणा यांनी दिली.
संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे दरवर्षी मार्केट यार्ड मित्र मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात येते. यंदाही या दिंडीचे फटाक्यांची आतषबाजी, फुलांची आकर्षक सजावट, मावळ येथील ढोल पथकाचे वादन, तुतारी वादक, नेवासा येथील हलगी पथकाच्या निनादात स्वागत करण्यात येणार आहे. दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या जवळपास 12 हजार भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. नगरकर भाविकांनी या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी व दर्शनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मार्केट यार्ड व्यापारी मित्र मंडळाने केले आहे.










