कोल्हार | नगर सह्याद्री
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे प्रवरा नदीपात्रालगत असलेल्या विहिरीमधून दि. 10 च्या रात्री तब्ब्ल 5 विद्युत मोटारची चोरी झाल्याची घटना घडली. विद्युत तारा देखील चोरी झाल्या असल्यामुळे परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अनेक छोट्या- मोठ्या चोऱ्यांचे सत्र गेल्या अनेक दिवसांपासून या भागात सुरू असून यावर अंकुश लावण्यात राहुरीचे पोलीस अपयशी ठरत असल्याने शेतकऱ्यांमधून पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत आहेत.
कोल्हार खुर्द येथे गेल्या अनेक दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांचे सत्र सुरु आहे. गावातील पाटीलवाडी परिसरातून गेल्या दोन ते तीन महिन्यांत सहा ते सात मोटारी चोरी गेल्या होत्या. हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी पिकांना जीवदान देण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे धाव न घेता नवीन मोटारी पुन्हा विहिरीत सोडून आपले काम सुरू ठेवले होते. दि 10 जूनच्या रात्री प्रवरा नदी परिसरातील शांताराम गाडेकर, विलास गलांडे, बाळासाहेब गलांडे, बेबीताई जोर्वेकर, विलास कातोरे या शेतकऱ्यांच्या एकाच रात्री पाच मोटारची चोरी झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे. विजेचा खेळखंडोबा, मोटारची चोरी आणि पिके वाचवण्याची वेळ अशा तिहेरी संकटात इथला शेतकरी सापडला आहे.
विलास कातोरे या शेतकऱ्याच्या सहा महिन्यात चार मोटारीची चोरी झाली असून, हा शेतकरी पाचवी मोटार चोरी गेल्यानंतर अक्षरशः धाय मोकलून रडत आहे. या भुरट्या चोरांचा धुमाकूळ गेल्या चार महिन्यांपासून सुरू असून, राहुरी पोलीस याबाबत अनभिज्ञ असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.










