- जाहिरात -spot_img
breaking news

माळीवाड्यात तुफान राडा!, दुकानावर डल्ला, गोमांस विक्रीचा पर्दाफाश, तरुणाला मारहाण, कुठे काय घडलं…

माळीवाड्यात तुफान राडा! / तरुणाला मारहाण करत सोन्याची साखळी अन् रोकड लांबवली; कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल
​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरातील माळीवाडा भागातील ब्राम्हण गल्लीत मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार भांडण आणि मारहाणीची खळबळजनक घटना घडली आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि रोख रक्कम बळजबरीने लांबवण्यात आली. ही घटना २१ जुलैच्या मध्यरात्री १२:०० ते १२:३० वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा खंडूअप्पा भागानगरे (वय ३०, रा. पंचपीर चावडी, अहिल्यानगर) यांना त्यांचा मित्र सागर डोंगरे याने फोन करून घरासमोर वाद सुरू असल्याची माहिती दिली. त्यामुळे कृष्णा भागानगरे हे घटनास्थळी गेले असता तेथे आरोपी केरप्पा हुच्चे उर्फ भाऊ, विशाल उर्फ बंडू हुच्चे, सुजाता हुच्चे आणि इतर चार अनोळखी महिलांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या मित्राला हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व घाणघाण शिवीगाळ केली.

​मारहाणीदरम्यान आरोपींनी “आम्ही एकाला पिस्तूलने संपवले आहे, यांना पण संपवून टाकू” अशी धमकी देत फिर्यादीच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आणि खिशातील १०४० रुपये रोख रक्कम काढून घेतली. ​या घटनेनंतर कृष्णा भागानगरे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

सावेडीतील दुकानावर डल्ला मारून १.५ लाखांचे साहित्य लांबवले
कोर्टाच्या आदेशानंतर तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल:
​अहिल्यानगर – सावेडी येथील संचारनगर परिसरात असलेल्या एका कपड्याच्या दुकानातून मालकाच्या संमतीशिवाय तब्बल १ लाख ५० हजार रुपयांचे शिवणकामाचे साहित्य चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, संचारनगर येथील रहिवासी हनुमंतराव रामराव गोपाळघरे (वय ६८) यांचे ‘मधुरा लेडीज शॉपी’ नावाचे दुकान आहे. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय दुकानातील अस्तरचे तागे, फॉलची बंडले, ब्लाऊज पीसचे गठ्ठे, लटकनचे डबे, लेस आणि नॉटचे रोल, दोऱ्याचे बॉक्स, बटणे, कटलरी आणि बनावट दागिन्यांचे बॉक्स असा सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा माल बळजबरीने चोरून नेला.

हे सुद्धा वाचा :  विखे परिवारामुळे पारनेरच्या विकासाची गती कायम ः राहुल शिंदे

​या प्रकरणी फिर्यादी हनुमंतराव गोपाळघरे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार २३ जुलै २०२६ रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यात दिपाली उर्फ राजश्री अमोल गोपाळघरे (वय ४०), शुभम ज्ञानदेव बडे (वय ३५), सोनाली अनिल चाटे (वय ३७) आणि गणेश विकास वारे (वय २१, सर्व रा. यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) या चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. एम. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर करत आहेत.

झेंडीगेट भागात बेकायदेशीर गोमांस विक्रीचा पर्दाफाश; तोफखाना पोलिसांची धाड ठोकून दोन आरोपींवर गुन्हा दाखल
​अहिल्यानगर : शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, व्यापारी मोहल्ला, सुभेदार गल्ली, झेंडीगेट येथे बेकायदेशीर गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलीस अंमलदार योगेश कर्डिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मोहम्मद सलीम फैयाज कुरेशी (वय ३३) आणि रिजवान फैयाज कुरेशी (वय २८, दोघे रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

​महाराष्ट्र राज्यात गोवंश जनावरांची कत्तल व विक्री करण्यास पूर्ण बंदी आहे. तरीही आरोपींनी कुठूनतरी गोवंशीय जनावरे आणून त्यांना चारा-पाण्याविना डांबून ठेवले होते. गोमांस विक्रीच्या उद्देशाने कत्तल करताना पोलिसांना एकूण ९५,३०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
​या कारवाईत पोलिसांनी ५४ हजार रुपयांचे १८० किलो गोमांस, ४० हजार रुपयांची ४ जिवंत गोवंशीय जनावरे, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, लोखंडी ससुर आणि लाकडी मुठीचा टोचा असा मुद्देमाल जप्त केला आहे. ​पोलीस निरीक्षक बी. एम. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. शहर परिसरात अशा प्रकारे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा :  स्टेटसवरून कर्डिले समर्थक संतप्त

दारूच्या नशेत मित्रांमध्ये राडा; शिवीगाळ करत दोघा भावांना बेदम मारहाण
​अहिल्यानगर : दारूच्या नशेत गल्लीत गोंधळ घालून जुन्या मित्राला आणि त्याच्या भावाला बेदम मारहाण केल्याची घटना प्रेमदान हडको परिसरात घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमदान हडको येथील रहिवासी हमजा फाईम सय्यद (वय १८) व त्यांचा भाऊ अरमान सय्यद हे घरी असताना आरोपी ईशान गोयल, ऋषभ गोयल आणि आदर्श ठाकूर (सर्व रा. प्रेमदान हडको) हे तिघे दारूच्या नशेत त्यांच्या घरासमोर आले. त्यांनी विनाकारण अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ​हमजा आणि त्याचा भाऊ भांडण सोडवण्यासाठी व विचारणा करण्यासाठी बाहेर आले असता, तिघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच आरडाओरडा करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर जखमी हमजाने सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे उपचार घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ​या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी. बी. दळवी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

जुन्या वादातून बेदम मारहाण व जीवे मारण्याची धमकी
टाकळी खातगाव परिसरातील धक्कादायक घटना;
​अहिल्यानगर : कौटुंबिक वादातून व जुन्या वैमनस्यातून एका २४ वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथे घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील चास ठाकरवाडी येथील रहिवासी मिलिंद मल्हार केदारे (वय २३) हे २१ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टाकळी खातगाव परिसरात आपल्या भावी पत्नी व नातेवाइकां सोबत बसलेले होते. त्यावेळी संशयित आरोपी विनायक प्रकाश केदारे, विक्रम प्रकाश केदारे आणि प्रकाश सखाराम केदारे (सर्व रा. चास ठाकरवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) हे त्या ठिकाणी आले.

​आरोपी विनायक याने “तू माझ्या पत्नीसोबत का राहतोस, अजून आमचा घटस्फोट झालेला नाही” असे म्हणत वाद घातला. यापूर्वीही आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस मारहाण केली होती. या वादाचे रूपांतर काही वेळातच गंभीर हिंसाचारात झाले. आरोपींनी बेकायदेशीरपणे शिवीगाळ करत मिलिंद केदारे यांच्यावर चाकूने प्राणघातक वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या घरातील लोकांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.
​या प्रकरणी जखमी मिलिंद केदारे यांच्या फिर्यादीवरून २३ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी विनायक केदारे, विक्रम केदारे आणि प्रकाश केदारे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरात आणि पोलीस हवालदार दुधाळ करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  भिंगारमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; तरुणीच्या नावे बनावट अकाउंट उघडणे भोवले

पेट्रोल भरण्यास जाणाऱ्या तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
​अहिल्यानगर – घरून दुचाकीवर पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर चाललेल्या एका तरुणाला रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याची घटना अहिल्यानगर येथील काळा माथा परिसरात घडली आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, आरोपींनी त्याला जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, आकाश रामेश्वर धनवटे (वय २७, रा. वारूळवाडी, ता. जि. अहिल्यानगर) हे आपल्या हिरो होंडा स्प्लेंडर गाडीवरून गांधीजी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होते. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास काळा माथा जवळील एका दवाखान्यासमोर आरोपींनी त्यांना अडवले. कोणतीही पूर्वकल्पना न देता सतिष साहेबराव कर्डिले याने शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने आकाश धनवटे यांच्या डाव्या हातावर जोरदार प्रहार केला.
​या वेळी सतिष कर्डिले याच्यासोबत रोहन धोत्रे, साहील धोत्रे, दिपक भानखिले, चिम्या गायकवाड, बारीक पेढेवाला आणि ओमकार किशोर डुकरे हेदेखील उपस्थित होते. या सर्वांनी एकत्र येऊन आकाश यांना मारहाण केली आणि आरडाओरड करत जिवे मारण्याची गंभीर धमकी दिली.

​या घटनेनंतर जखमी आकाश धनवटे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सतिष कर्डिलेसह इतर आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खामकर करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ