भांडगाव खून प्रकरणाचा छडा
कौटुंबिक कलहातून हातोड्याने वार करून केला खून; आरोपी 24 तासांत गजाआड
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील भांडगाव (भुजबळवस्ती) येथे एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे, काकानेच आपल्या पुतण्याचा अत्यंत निर्घृणपणे खून केला. चोरीचा बनाव रचून करण्यात आलेल्या या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या 24 तासांत यश आले असून, आरोपी काकाला अटक करण्यात आली आहे. संदीप भास्कर खरमाळे असे मृत पुतण्याचे नाव असून, महेश हनुमंत खरमाळे (वय 45, रा. भुजबळवस्ती, भांडगाव, ता. पारनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी काकाचे नाव आहे.
15 मे रोजी पहाटेच्या सुमारास भांडगाव येथील भुजबळवस्तीत ही घटना घडली. फिर्यादी सिद्धेश संदीप खरमाळे यांचे वडील संदीप भास्कर खरमाळे हे घरात असताना अज्ञात इसमाने चोरीच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात गंभीर वार करून त्यांचा खून केला होता. तसेच घरातील 12 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी 16 मे रोजी पारनेर पोलीस ठाण्यात खुनाचा व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. गुन्ह्याचा तपास जलद गतीने करून आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला देण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विलेषण आणि गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, हा गुन्हा मयताचा काका महेश खरमाळे यानेच केला आहे आणि तो सध्या एका मोटारसायकलवर पाठीमागे बॉक्स बांधून भांडगाव ते जामगाव रस्त्याने जात आहे. पोलिसांनी तातडीने या रस्त्यावरील तळ्याजवळ सापळा रचला आणि संशयित महेश खरमाळे याला शिताफीने ताब्यात घेतले.
पावणे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी 10 लाख 29 हजार रुपयांची रोकड, 40 हजार रुपयांची मोटारसायकल, 10 हजार रुपयांचा मोबाईल, मृत व्यक्तीचे आधारकार्ड आणि गुन्ह्यात वापरलेली दोरी असा एकूण 10 लाख 84 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पारनेर पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
काकाने दिली गुन्ह्याची कबुली
पोलिसांनी आरोपी महेश याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने कौटुंबिक कारणातून आणि पैशांच्या हव्यासापोटी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. 15 मे च्या पहाटे पुतण्याच्या घरात प्रवेश करून त्याच्या डोक्यात हातोड्याने जबर वार केले आणि त्याला जिवे ठार मारून घरातील रोख रक्कम चोरल्याचे त्याने मान्य केले.










