जगताप परिवाराच्या हातून परमब्रम्ह्दान असलेल्या अन्नदानाचा उपक्रम कायम होत राहो : जैनमुनी अलोकऋषीजी महाराज
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
स्व.अरुण जगताप व परिवाराने सर्व साधू संतांशी आपुलकीचे नाते जपले आहे. नगरच्या विकासासाठी खूप चांगले कार्य त्यांनी केले आहे. स्व.अरुण जगताप यांच्या जयंतीनिमित्त अन्नदानाचा स्तुत्य उपक्रम राबवला गेला आहे. अन्नदानास परमब्रम्ह्दान म्हंटले गेले आहे. असे सामाजिक कार्य जगताप परिवाराच्या हातून कायम होत राहो, अशा मंगलकामना जैनमुनी अलोकऋषीजी महाराज यांनी व्यक्त केल्या.
माजी आमदार स्व.अरुणकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त काका ट्रस्टच्या वतीने स्व.अरुणकाका जगताप अन्नछत्रालयाचा शुभारंभ जैनमुनी अलोकऋषीजी महाराज व ग्रामदैवत श्री विशाल गणपती देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज यांच्या शुभहस्ते झाले. मार्केटयार्ड जवळील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालया समोरील नागेश्वर महादेव मंदिरात हे अन्नछत्रालय सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत गरजूंना मोफत भोजन मिळणार आहे.
या कार्यक्रमास श्रीमती पार्वतीबाई जगताप, महापौर ज्योती गाडे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, आ.संग्राम जगताप, जिल्हापरिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप व सुवर्णा जगताप, माजी नगरसेविका शीतल जगताप, स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर गणेश भोसले, राजेंद्र चोपडा, कोशोर डागवाले, हितेश ओबेरॉय, यांच्यासह मोठ्या संख्येने सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, उद्योग अशा सर्वच क्षेत्रातील नागरिक, राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपा युतीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह स्व.अरुणकाका जगताप यांचे अनेक स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्वांनी स्व.अरुणकाका जगताप यांच्या स्मृतींना व केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांना जड अंत:करणाने अभिवादन केले. स्व.अरुणकाका यांच्या सारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणार नाही असा भाव यावेळी व्यक्त झाला. यावेळी अरविंद शिंदे, राजेंद्र चोपडा, सुहास मुळे, ज्ञानेश्वर रासकर, सुमतीलाल कोठारी, भगवान फुलसुंदर, विजय परदेशी, अजय फुंदे, गणेश कवडे, अविनाश घुले व अनिल मोहिते आदींनी मनोगत व्यक्त करून स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या स्मृती जागवल्या.
सर्वांचे आभार मानताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, स्व. अरुणकाका जगताप यांनी कायम अन्नदानाला महत्त्व देत विविध उपक्रम राबवले. त्यांच्या पश्चात हा वारसा अखंडितपणे पुढे नेण्यासाठी तसेच गरजूंना मदत व्हावी या उद्देशाने सुरु केलेले हे मोफत अन्नछत्र अखंडितपणे दररोज सुरू राहणार आहे. स्व. अरुणकाकांच्या प्रथम वर्षश्राद्ध दिनी दि.२१ एप्रिल रोजी मोठ्या स्वरूपात अध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्व.काकांच्या निधनानंतर सर्व नागरिकांनी जगताप परिवाराला मोठा आधार दिला याबद्दल सर्वांचे आभार मानतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केले. काका ट्रस्टचे अनुप काळे यांनी आभार मानले. काका ट्रस्टच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.










