तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला
अहिल्यानगर
शहरातील तोफखाना परिसरातील सातभाई गल्लीत गाडी धुण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणावर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपी चेतन मोडक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुभम भाऊसाहेब थोरात या तरुणाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शुभम थोरात आणि त्याचा मित्र प्रणय नवनाथ तुपे हे दोघे घरामागे मोटारसायकल धुण्याचे काम करत होते. त्याच वेळी तिथे राहणारा त्यांचा ओळखीचा तरुण चेतन मोडक हा दुचाकीवरून तिथे आला. त्याने माझी देखील दुचाकी धुवून दे असे शुभमला सांगितले. शुभम दुचाकीवर पाणी मारत असताना अचानक चेतनच्या अंगावर पाण्याचे काही थेंब उडाले. याच गोष्टीचा प्रचंड राग मनात धरून चेतन याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने चेतनने लोखंडी रॉड आणून शुभम आणि त्याचा मित्र प्रणय याला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शुभमच्या दोन्ही हाताला दुखापत झाली, तर मित्र प्रणय याच्या उजव्या कानाला धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संतोष गर्जे करत आहेत










