दिंडीला ३०० वर्षीची परंपरा
राहुरी/ नगर सह्याद्री
टाळ -मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि श्री संत कवी महिपती महाराजांच्या जयजयकारात प्रतिपंढरपूर असलेल्या श्रीक्षेत्र ताहाराबाद येथील भावभक्तीने भरलेला महिपतींचा पायी दिंडी सोहळा विठुरायाच्या भेटीला पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला.
श्रीक्षेत्र ताहाराबादला महिपती महाराजांच्या समाधी मंदिराच्या प्रांगणात रामपूर येथील गिताबाई लोखंडे व गाडकवाडी येथील रामभाऊ सुरुसे यांच्या अश्वांच्या नृत्यामुळे भाविकांची मने जिंकली. पालखी सोहळ्यातील रथासाठी असलेल्या बेलकरवाडी येथील मच्छिंद्र आहेर यांच्या बैल जोडीने पालखी सोहळ्याचे आकर्षण वाढविले. संत महिपतींची ३०० वर्षांची परंपरा आजतगायत मोठ्या दिमाखात चालू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठा पालखी सोहळा आहे.
प्रास्तविक़ देवस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाबासाहेब महाराज वाळुंज यांनी केले. देवस्थानचे मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे यांनी पायी दिंडी सोहळ्याची आख्यायिका सांगून वारीचे महत्त्व सांगितले. तर देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे यांनी वारकऱ्यांना शुभेच्छा देऊन स्वरक्षण व विमाकवच ह्याविषयी माहिती दिली.
राहुरी शहरात पालखीचे आगमन होताच राहुरी तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन युवराज तनपुरे यांनी खरेदी विक्री संघाचा प्रांगणात पालखीचे पुजन करून वारकऱ्यांना चहा,नाष्टा, पाणी व फळांचे वाटप केले. यावेळी ताहाराबादचे उपसरपंच पप्पू माळवदे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मारुती हारदे, दत्तात्रय ढोकणे , ऋषिकेश म्हसे आदी उपस्थित होते.










