- जाहिरात -spot_img
breaking news

श्रीकुमार चिंचकर प्रांत, तरीही वापरले कलेक्टरचे अधिकार!

हजारो प्रकरणांत अधिकार कक्षा ओलांडली | चौकशीत दोषी आढळूनही प्रांताधिकाऱ्यावर कारवाई का नाही?
पाठलाग बातमीचा / शिवाजी शिर्के
सव्वा लाखांच्या लाचखोरीच्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या श्रीगोंदा- पारनेर उपविभागाचे प्रांत श्रीकुमार चिंचकर याला त्याच्या अधिकार कक्षेचे भानच राहिले नसल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. गाळपेर जमिन लगतच्या खातेदार शेतकऱ्याला देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. मात्र, चिंचकर याने हे अधिकार वापरले आणि लाखो रुपयांची माया कमवली. श्रीगोंदा तालुक्यात अशी अनेक प्रकरणे घडली. अधिकारकक्षा ओलांडल्याचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद असताना चिंचकर याच्यावर कोणतीच कारवाई का नाही असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

चिंचकर याने श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमाला या गावातील रामदास निवृत्ती धावडे व इतरांनी तेथील गाळपेर जमिन मिळण्यासाठी प्रांत कार्यालयाकडे अर्ज केला. त्यानुसार मंडळाधिकारी, तहसीलदार यांचा अहवाल आल्यानंतर श्रीकुमार चिंचकर याने अधिकार कक्षा ओलांडली आणि तशी परवानगी दिली. ही परवानगी आदेश देताना महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 33 अन्वये हा आदेश देत असल्याचे नमूद केले. या प्रकरणातील जमिन ही भूसंपादीत केलेली शासकीय जमिन असल्याने सदर जमिन ही जलओढ नव्हती व नाही. त्यामुळे चिंचकर याने नमूद केलल्या आदेशातील कलम 33 हे त्यास लागू होतच नव्हते. तरीही चिंचकर याने कलम 33 नुसार आदेश देत असल्याचे म्हटले. वास्तविक पाहता कलम 33 नुसार आदेश पारीत करण्याचे अधिकार हे फक्त जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. तरीही मलिद्याच्या हव्यासातून चिंचकर याने अधिकार कक्षेबाहेर जात स्वत: जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार वापरल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.

गाळपेरच्या अधिकाराचा विचार केल्यास महाराष्ट्र जमिन महसूल सरकार जमिनीची विल्हेवाट लावणे नियम 1979 चे कलम 21 अ मध्ये गाळपेर जमिनीची विल्हेवाट लावणे बाबत नियम करण्यात आला आहे आणि तो अधिकार फक्त जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. हे सारे प्रांताधिकारी असणाऱ्या श्रीकुमार चिंचकर याला माहिती होते. तरीही त्याने गैरकायद्याने आणि मलिद्यासाठी हे सारे केल्याचे लपून राहिलेले नाही.

हे सुद्धा वाचा :  सुजित झावरे विधान परिषद निवडणुकीसाठी थेट मैदानात... कोणाला दिले आव्हान

बावनकुळे साहेब, तुमच्या नावाचा बाजार भरवलाय!
लाचखोरीच्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर याने या पदावर हजर झाल्यापासून रोज महसूलमंत्री बावनकुळे यांच्या नावाचा गजर सुरू ठेवला आहे. त्यांच्याच आशीर्वादाने आपण येथे आलो असल्याचे तो सांगत सुटला आहे. ‌‘वाटा द्यावा लागतो‌’, असे जाहीरपणे बोलून महसूलमंत्री बावनकुळे यांना बदनाम करण्याची सुपारीच चिंचकर याने घेतली असल्याचे लपून राहिलेले नाही.

चिंचकर म्हणतो, आमदारांना खातो कोण?
माझ्या पाठीशी माझा बॉस आहे. त्यांच्या आशिर्वादाने मी जे काही करतो ते करत राहणार. माझ्या विरोधात आमदारांनी तक्रार केली तरी मला काहीच फरक पडत नाही. त्यांच्या तक्रारीला खातो कोण अशा भाषेत श्रीगोंदा- पारनेर उपविभागाचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर याने दर्पोक्ती केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आ. काशिनाथ दाते आणि आ. विक्रमसिंह पाचपुते यांनी चिंचकर याच्या विरोधात मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर चिंचकर याने ही दर्पोक्तीची भाषा वापरल्याने आश्चर्य वक्त होत आहे.

राम शिंदे सर, तुमच्या आदेशालाही महसूलकडून केराची टोपलीच
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश स्वत: वापरणाऱ्या चिंचकर याच्याबद्दल विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. शिंदे यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. सात दिवसात चौकशी करुन अहवाल द्या, असे आदेश प्रा. राम शिंदे यांनी दिले. मात्र, महसूलकडून अद्यापही हा अहवाल विधान परिषद सभापतींना सादर झाला नाही. राज्याचे सर्वोच्च सभागृहाचे सभापती असणाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली हे विशेष!

चिंचकरच्या कृतीने सहाजण झाले जायबंदी!
चुकीच्या पद्धतीने फक्त आणि फक्त मलिदा घेऊन चिंचकरने आदेश दिला. आदेश हातात पडताच अर्जदार त्या जमिनीवर गेले. त्यानंतर ज्यांच्या ताब्यात ती जमिन होती ते लक्ष्मण शिंदे, काशिनाथ शिंदे व अन्य मंडळी समोर आली. यात शिंदे कुटुंबातील सहा-सात जण जायबंदी होईपर्यंत जखमी झाले. दोघांना मरणासन्न वेदना झाल्या. यानंतर आदेशाच्या विरोधात तक्रारी झाल्या. चिंचकर बाबत थेट महसूलमंत्र्यांकडे तक्रार झाली. चौकशी झाली. कागदावर चिंचकरने अधिकाराचे उल्लंघन केले असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी शेवटचे वाक्य वापरले. पुढे काय असा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेच.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ