ढवळपुरीचे श्रीराम मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान : महंत रामगिरी महाराज
पारनेर | नगर सह्याद्री
श्रीराम मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून समाजाला एकत्र आणणारे संस्कारपीठ आहे. ग्रामस्थांनी एकोप्याने उभारलेले ढवळपुरीचे हे मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल. प्रभू श्रीरामांच्या आदर्शांचे पालन करून समाजात सद्भावना, सेवा आणि संस्कार जोपासावेत, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
तालुक्यातील ढवळपुरी येथे ग्रामस्थांच्या अभूतपूर्व लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिराचा मूत प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण व मंदिर लोकार्पण सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तीन दिवस चाललेल्या या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्याला परिसरातील हजारो भाविकांनी हजेरी लावत श्रीरामांच्या दर्शनाचा लाभ घेतला.
सोहळ्याची सुरुवात प्रभू श्रीराम आणि महंत रामगिरी महाराज यांच्या भव्य मिरवणुकीने झाली. या मिरवणुकीत दुर्गा देवी विद्यालय व आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ढोल-ताशांचा गजर, पारंपारिक वाद्ये आणि ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने संपूर्ण ढवळपुरी नगरी दुमदुमून गेली होती.
मुख्य सोहळ्याच्या दिवशी महंत रामगिरी महाराज यांच्याहस्ते कलशारोहण, श्रीराम मूतची प्राणप्रतिष्ठा, महापूजन, कलश कुंभाभिषेक, महाआरती आणि कीर्तनसेवा संपन्न झाली. या तीन दिवसीय महोत्सवात वास्तुशांती, ग्रामप्रदक्षिणा, गणेश पूजन, नवग्रह स्थापना, रुद्र, विष्णू व रामयाग, होम-हवन, विविध अधिवास विधी आणि दुर्गामातेची कावड यात्रा असे विविध धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योगपती सुवालाल पोखरणा उपस्थित होते. शिवसेना नेते सुजित झावरे पाटील, भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, उद्योजक अंकुश चौधरी, दत्तानाना पवार, पुष्कर पोखरणा, अभिजीत पोखरणा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सर्वपक्षीय राजकीय नेते आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सरपंच नंदाताई गावडे, उपसरपंच बबनराव पवार, डॉ. राजेश भनगडे, श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष संदीप थोरात, उपाध्यक्ष संतोष बुचडे, सचिव रमेश केदारी, खजिनदार मच्छिंद्र व्यवहारे, विश्वस्त दत्तात्रय थोरात, पियुष कुंभकर्ण, संभाजी ढेकळे, युवा उद्योजक प्रकाश वाघ, संतोष थोरात आणि सर्व ढवळपुरी ग्रामस्थांनी अहोरात्र परिश्रम घेतले. ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकारलेले हे भव्य मंदिर ढवळपुरीच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणारे ठरले असून, हा सोहळा गावकऱ्यांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला आहे.










